अमरावती : प्रहार जनशक्‍ती पक्षाचे अचलपूरचे आमदार बच्‍चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्‍यात पुन्‍हा एकदा वाद उफाळून येण्‍याची शक्‍यता आहे. बच्‍चू कडू यांनी लोकसभा निवडणुकीत प्रहार पक्षाची उमेदवारी मागे घेण्‍यासाठी आपल्‍याला पैसे मागितले होते, असा आरोप रवी राणा यांनी केला आहे. बच्‍चू कडू हे प्रत्‍येक जिल्‍ह्यात जाऊन नेत्‍यांना शिव्‍या देतात, तोडपाणी करतात, अशी टीका देखील त्‍यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आमदार रवी राणा म्‍हणाले, अचलपूर मतदार संघ भकास झाला आहे. विद्यार्थ्‍यांसाठी शिक्षणाची सुविधा नाही, एकही नवीन महाविद्यालय त्‍यांनी आणले नाही. स्‍वत:च्‍या मतदारसंघात त्‍यांचे लक्ष नाही. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पण, ते वेगवेगळ्या जिल्‍ह्यांमध्‍ये जाऊन नेत्‍यांना शिव्‍या घालतात. केंद्र सरकारच्‍या योजनांचे अनुदान बच्‍चू कडू यांनी लाटले आहे. अनेक उद्योग बंद पडले.

हेही वाचा…अकोला : फुकटचे डिझेल लुटण्यासाठी नागरिकांची झुंबड! काय आहे प्रकार जाणून घ्या…

पण, त्‍याकडे ते लक्ष देत नाहीत. बच्‍चू कडू हे निवडणुकीत नेत्‍यांकडून पैसे घेतात. अमरावती लोकसभा मतदारसंघात प्रहार जनशक्‍ती पक्षाचा उमेदवार उभा करण्‍यात आला. नवनीत राणा यांना पराभूत करण्‍यासाठी त्‍यांनी प्रयत्‍न केले, पण, त्‍याआधी उमेदवारी मागे घेण्‍यासाठी आपल्‍याकडे पैसे मागितले, ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे, असा आरोप रवी राणा यांनी केला.

अचलपूरची फिनले मिल गेल्‍या चार वर्षांपासून बंद आहे. ती सुरू करण्‍यासाठी त्‍यांनी काहीच प्रयत्‍न केले नाहीत. पण, माजी खासदार नवनीत राणा, मी स्‍वत: फिनले मिल सुरू व्‍हावी, यासाठी पाठपुरावा केला. तत्‍कालीन केंद्रीय मंत्री स्‍मृती इराणी, पीयूष गोयल, गिरीराज सिंह यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍याकडेही आम्‍ही पाठपुरावा केला. त्‍यामुळे नुकतीच मुंबई येथे देवेंद्र फडणवीस आणि वस्‍त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या उपस्थितीत बैठक घेण्‍यात आली.

हेही वाचा…आरोप करण्यापेक्षा नार्को टेस्टला समोरे जा, देशमुख यांना बावनकुळेंचे प्रतिउत्तर

या बैठकीत काम‍गारांचे थकीत २० कोटी रुपये देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. ही मिल राज्‍य सरकारने चालवण्‍यासाठी केंद्राकडे प्रस्‍ताव पाठविण्‍याविषयी निर्णय झाला. आम्‍ही सर्व प्रयत्‍न केले असताना बच्‍चू कडू हे आता श्रेय लाटण्‍याची धडपड करीत आहेत, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे.

हेही वाचा…अकरावीच्‍या विशेष फेरीची गुणवत्‍ता यादी उद्या जाहीर होणार

रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात यापूर्वीही अनेक वेळा वाद उफाळून आले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडाला होता. बच्चू कडू यांनी खोके घेतले होते, असाही आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यावर कडू यांनी प्रत्युत्तर दिले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi rana accuses bachchu kadu of demanding money to withdraw lok sabha candidate mma 73 psg
Show comments