अमरावती : युवा स्‍वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा यांना मंत्रिमंडळात स्‍थान न मिळाल्‍याने त्‍यांचे समर्थक निराश झालेले असतानाच हिवाळी अधिवेशन काळात विधानसभेत उपस्थित न राहण्‍याचा निर्णय घेत रवी राणांनी आपली नाराजी उघड केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवी यांना मंत्रिपद न मिळाल्‍याने रविवारी नवीन मंत्र्यांचा शपथविधी सुरू होण्‍याआधीच ते नागपूरहून अमरावतीत आपल्‍या निवासस्‍थानी परतले. तेव्‍हापासून ते शहरातच आहेत. त्‍यांनी नागपूर अधिवेशनात उपस्थित न राहण्‍याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी दिवसभर ते मालखेड नजीकच्‍या आपल्‍या शेतात होते. त्‍यांनी आपल्‍या शेतात गोसेवा केल्‍याचे त्‍यांच्‍या समर्थकांनी सांगितले. काल सोमवारी ते नागपुरात परत जातील आणि अधिवेशनात सहभागी होतील, अशी अटकळ होती, पण त्‍यांनी नागपुरात जाण्‍याचे टाळले.

हेही वाचा – Mahavikas Aghadi Protest March : ‘महायुती सुसाट, गुन्हेगार मोकाट’, विरोधकांनी विधानभवनात…

अद्याप त्‍यांनी प्रसारमाध्‍यमांसमोर प्रतिक्रिया व्‍यक्‍त केली नसली, तरी त्‍यांची नाराजी लपून राहिलेली नाही. मंत्रिपद मिळणार नाही, हे लक्षात येताच ते तातडीने नागपूरहून अमरावतीत पोहोचले. मंत्रिपद मिळावे, यासाठी गेल्‍या आठवड्यात रवी राणा यांनी चांगलाच पाठपुरावा केला होता. दादर रेल्‍वे स्‍थानक परिसरातील हनुमान मंदिर हटविण्‍याच्‍या मुद्यावर शिवसेना ठाकरे गट आणि भाजप आमने-सामने आल्‍यानंतर गेल्‍या शनिवारी रवी राणा यांनी दादर येथील त्‍या मंदिरात पोहोचून आरती केली होती. भाजप नेतृत्‍वाचे लक्ष वेधून घेण्‍याचा त्‍यांचा प्रयत्‍न होता. पण, यावेळीही त्‍यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली.

मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरत नसताना रवी राणा यांनी पत्रक काढून देवेंद्र फडणवीस यांना जाहीर पाठिंबा दिला होता. रवी राणा हे सुरुवातीपासूनच फडणवीसांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांना मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती. रवी राणा यांच्‍या युवा स्‍वाभिमान पक्षाच्‍या कार्यकर्त्‍यांनीही उघडपणे नाराजी व्‍यक्‍त केली आहे. मंत्रिमंडळाचा विस्‍तार होण्‍याआधीच शहरातील चौकांमध्‍ये रवी राणा यंदा पालकमंत्री होणार, अशा आशयाचे फलक देखील झळकले होते.

हेही वाचा – रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘या’ ९ रेल्वे रद्द…

नवनीत राणांचीही नाराजी

भाजपच्‍या नेत्‍या नवनीत राणा यांनी देखील रवी राणांना मंत्रिपद न मिळाल्‍याने काव्‍यात्‍मक ओळी सादर करीत पोस्‍टमधून नाराजी व्‍यक्‍त केली होती. “समंदर को क्या गम है, वो बता भी नहीं सकता.. पानी बनकर आंखो में आ भी नहीं सकता, जिंदगी है… लडाई जारी है……”, अशा ओळी म्हणत नवनीत राणा यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या होत्‍या.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi rana amravati unhappy nagpur winter session mma 73 ssb