लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : आमदार बच्‍चू कडू हे आमचे मोठे बंधू आहेत. पण, तोडीबाज म्‍हणून त्‍यांची ओळख आहे. त्‍यांच्‍या मालमत्‍तेची माहिती आपल्‍याकडे आहे. त्‍यांनी आमच्‍या विरोधात राजकारण करू नये, इथे रवी राणांसोबत गाठ आहे, असा इशारा आमदार रवी राणा यांनी जाहीर सभेत बोलताना दिला.

भाजपच्‍या उमेदवार नवनीत राणा या उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी येथील दसरा मैदनावर आयोजित जाहीर सभेत बोलताना रवी राणांनी बच्‍चू कडू यांच्‍यावर जोरदार टीका केली.

आणखी वाचा-यवतमाळमध्ये धावती रुग्णवाहिका पेटली; गर्भवतीसह चार जण सुदैवाने बचावले

रवी राणा म्‍हणाले, बच्‍चू कडू हे सरकारचा पूर्ण उपयोग करून घेतात, महायुतीत आहोत असे सांगतात. पण अमरावती मतदार संघात नवनीत राणांच्‍या विरोधात उभे ठाकतात. राणा यांना पराभूत करायचे आहे, असे सांगतात. राणांना पराभूत करून त्‍यांना कुणाला निवडून आणायचे आहे, हे आधी सांगा. खरे तर बच्‍चू कडू यांची ओळख एक तोडीबाज म्‍हणून आहे. कुठे पैशांचे प्रकरण आले की त्‍या ठिकाणी बच्‍चू कडू हे मधात पडतात आणि ‘सेटलमेंट’ करून घेतात, असा आरोप रवी राणा यांनी केला.

आणखी वाचा-“नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाने आशीर्वाद दिला”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

आमदार बच्‍चू कडू हे महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात मंत्री होते, तिवसाच्‍या काँग्रेसच्‍या आमदार यशोमती ठाकूर या मंत्री होत्‍या. आपण शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नांवर मोझरी येथे आंदोलन केले, तेव्‍हा आपल्‍याला दिवाळीच्‍या दिवशी तुरूंगात जावे लागले. त्‍यावेळी या नेत्‍यांनी आपली मदत केली तर नाहीच, पण तुरूंगात आपल्‍याला सतरंजी देखील देऊ नका, असे फोन केले. यांच्‍या ३३ महिन्‍यांच्‍या सरकारच्‍या काळात आपल्‍या अनेक चौकशा झाल्‍या, पण त्‍यांच्‍या हाती काहीच लागले नाही. बच्‍चू कडू यांच्‍या अचलपूर मतदार संघात आरोग्य केंद्रांच्‍या छताला छिद्रे पडली आहेत. शाळांची दूरवस्‍था झाली आहे, पण त्‍याकडे त्‍यांचे लक्ष नाही. अचलपुरात अंधार आहे आणि ते राज्‍यातील इतर भागात दिवे दाखवत फिरताहेत, अशी टीका रवी राणा यांनी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi rana criticized bachchu kadu while bjp candidate navneet rana was filing his nomination form mma 73 mrj