अमरावती : नवरात्रौत्सव, गणेशोत्सवाप्रमाणेच दहीहंडी उत्सवातून विशेषत: तरूणाईला संघटित करण्याचा प्रयत्न केला जातो. गावागावांत तरूण खांद्याला खांदा लावून दहीहंडी उत्सव साजरा करताना दिसतात. मात्र, कालौघात उत्सवांच्या आयोजनामागील उद्दिष्टे बदलली असून त्याला राजकीय स्वरूप आले आहे. दहीहंडी कार्यक्रमाच्या आयोजनातून राजकीय शेरेबाजी देखील केली जात आहे.
धारणी येथे शुक्रवारी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित दहीहंडी कार्यक्रमात बोलताना आमदार रवी राणा यांनी मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्यावर टीका केली. मेळघाटातील आमदाराच्या भ्रष्टाचाराची दहीहंडी विधानसभा निवडणुकीत फुटणार आहे, असा दावा त्यांनी केला. यावेळी सिने अभिनेते गुलशन ग्रोवर उपस्थित होते.
हेही वाचा >>> नागपुरातील लाडकी बहीण मेळाव्यावर आशा सेविकांचा बहिष्कार.. झाले असे की…
रवी राणा म्हणाले, मेळघाटच्या आमदाराने आपल्या कार्यकाळात काहीही कामे केली नाहीत, त्यांना लोक कंटाळले आहेत. त्यांच्या भ्रष्टाचाराची दहीहंडी लवकरच फुटणार आहे. नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या, पण गेल्या पाच वर्षांत त्यांनी मेळघाटातील लोकांचा आवाज बनून कामे केली. आता विधानसभा निवडणुकीत स्वत: नवनीत राणा या लढत देत आहेत, या भावनेतून मेळघाटवासीयांनी आमच्या पाठीशी उभे रहावे आणि विद्यमान आमदाराचा पराभव करावा.
नवनीत राणा म्हणाल्या, मी लोकसभेच्या निवडणुकीत नापास झाली असली, तरी मेळघाट विधानसभा मतदार संघातील लोकांनी मला सर्वाधिक मते देऊन पास केले आहे. आपण सर्व लोक माझ्या सोबत आहात. मी मेळघाटची मुलगी या भावनेतून सातत्याने कामे करीत होती. या नात्याने रवी राणा हे मेळघाटचे जावई आहेत. जावयाचा मान तुम्ही नक्कीच ठेवणार, असा मला विश्वास आहे.
हेही वाचा >>> रामझुला हिट अँड रन प्रकरणाचा तपास पोलिसांकडून काढला….आता अखेर सीआयडीकडे…
नवनीत राणा म्हणाल्या, विरोधकांनी खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल केली. संविधान संकटात असल्याचा कांगावा त्यांनी केला. बँक खात्यात खटाखट पैसे येतील, अशा थापा दिल्या. आता लोक अशा लोकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाहीत, असा मला विश्वास आहे. खोट्या प्रचारामुळेच माझा पराभव झाला, असा दावा नवनीत राणा यांनी केला. नवनित राणा यांनी अचलपूर जिल्हा निर्मीतीचा संकल्प करुन अमरावतीमध्ये होत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून संपूर्ण मेळघाटातील आदिवासी जनतेवर उपचार होणार असल्याचे स्पष्ट केले, तसेच अमरावती ते परतवाडा ते धारणी ते खंडवा या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात येणार असल्याचे सांगितले.