अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तरी काही फरक पडणार नाही, असं विधान आमदार रवी राणा यांनी नुकताच एका सभेत बोलताना केलं होतं. यावेळी राणा यांचा बोलण्याचा रोख अजित पवार गटाच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्यावर होता. यासंदर्भात बोलताना ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ असं म्हणत अजित पवार यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना योग्य शब्दात समज द्यावी, असं सल्लाही त्यांनी दिला होता. दरम्यान, अजित पवारांच्या या टीकेला आता रवी राणा यांनी प्रत्युतर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रवी राणा यांनी आज टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांनी केलेल्या टीकेबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, लोकसभेला जेव्हा सुलभा खोडके यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात काम केलं, तेव्हा अजित पवारांना हा ओळी आठवल्या नाही का? असा प्रश्न त्यांनी विचारला.

नेमकं काय म्हणाले रवी राणा?

“लोकसभेला नवनीत राणा या महायुतीच्या खासदारकीच्या उमेदवार होत्या. त्यावेळी सुलभा खोडके यांची विनाशकाले विपरीत बुद्धी कुठं गेली होती. त्यावेळी खोडके यांनी नवनीत राणांच्या विरोधात प्रचार केला. ज्यावेळी अजित पवार अमरावतीत नवनीत राणा यांच्या प्रचाराला आले, तेव्हा सभेलाही त्या आल्या नाहीत. त्याठिकाणी त्यांच्या फोटो वापरण्यासही त्यांनी नकार दिला. एकंदरिकतच ज्यावेळी सुलभा खोडके यांनी नवनीत राणांच्या पराभवासाठी युद्ध पातळीवर काम केलं, तेव्हा अजित पवार यांनी त्यांची कानउघडणी का केली नाही? ते त्यांना हा श्लोक का आठवला नाही?” असं रवी राणा म्हणाले.

“आता त्यांना भोगावे लागतील”

“खरं तर जसं कर्म कराल, तसं फळ आपल्याला मिळत असतं. आज अमरावती शहरात सुलभा खोडके तिसऱ्या क्रमांकवर आहे. तिथे काँग्रेस आणि जगदीश गुप्ता यांच्यात मुख्य लढत आहे. आज अजित पवार काहीही बोलले, तरी लोकसभेला ते का शांत राहिले? याचं उत्तर आधी त्यांनी द्यावं. लोकसभेला सुलभा खोडके यांनी नवनीत राणा यांचे काम केलं नाही. म्हणून त्यांच्या विरोधात जनतेचा रोष आहे. त्यांचे परिणाम आता त्यांना भोगावे लागतील”, अशी प्रतिक्रियाही रवी राणा यांनी दिली.

“अजित पवारांना जशास तसं उत्तर देण्यास मी सक्षम”

दरम्यान, रवी राणांच्या बोलण्यामुळे नवनीत राणांचा पराभव झाला, अशी टीकाही अजित पवार यांनी केली होती. यासंदर्भात विचारलं असता, “अजित पवार हे महायुतीचे नेते आहेत आणि महायुतीत आम्ही सगळे एकत्र आहे. एकत्र असताना त्यांनी असं बोलणं हे त्यांना शोभत नाही. ते जर अशाप्रकारे विधानं करत असतील, तर जशास तसं उत्तर देण्यास रवी राणा सक्षम आहे”, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravi rana replied to ajit pawar criticized amravati sulbha khodke spb