अमरावती जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निकालावर बोलताना काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी अपक्ष आमदार रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली होती. या निवडणुकीत हनुमान चालिसेचा गैरवापर करणाऱ्यांना आणि रंग बदलणाऱ्यांना सरड्यांना शेतकऱ्यांनी धडा शिकवला आहे, असं त्या म्हणाल्या होत्या. दरम्यान, या टीकेला आता आमदार रवी राणा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं”, नारायण राणेंच्या आव्हानावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

काय म्हणाले रवी राणा?

“भगवान राम आणि हनुमान आमच्या हृदयात आहेत. हनुमान चालिसा म्हटल्यावर महाविकास आघाडीने आम्हाला तुरुंगात टाकलं होतं. यशोमती ठाकुरांना हनुमान चालिसा आणि भगवान राम आवडत नसेल, तर तो त्यांच्या प्रश्न आहे, पण आम्ही कोणत्याही परिस्थिती हनुमान चालिसा म्हणणारच. कारण भगवान राम आणि हनुमान हे आमचे दैवत आहेत”, असं प्रत्युत्तर रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना दिलं आहे.

“तेव्हा त्यांनी माझ्याविरोधात सत्तेचा गैरवापर केला”

“शेतकरी संकटात असताना मी अनेकदा आंदोलनं केली आहेत. या आंदोलनांची सुरुवात मी तुकडोजी महाराजांच्या समाधीस्थळापासून केली होती. तेव्हा यशोमती ठाकूर यांनी सत्तेचा गैरवापर करत मला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी सहा दिवस तुरुंगात होतो. त्यामुळे भगवान राम आणि हनुमान यांच्यासह शेतकरीसुद्धा माझे दैवत आहे”, असेही ते म्हणाले.

“…तर आम्ही शेतकऱ्यांसाठी पुन्हा आंदोलन करू”

“बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांनी यशोमती ठाकूर यांना सत्ता दिली आहे. त्याचा वापर त्यांनी आता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी करावा. मात्र, जेव्हा आवश्यकता असेल, तेव्हा आम्ही शेतकऱ्यांसाठी पुन्हा आंदोलन करू”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

हेही वाचा – “निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी विवाह केला…”, जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटवर चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, “लव्ह जिहादचं निर्लज्जपणे समर्थन करणारेच…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणाल्या होत्या?

दरम्यान, बाजार समितीच्या निकालावर बोलताना आमदार यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर जोरदार टीका केली होती. “शेतकऱ्यांना खरं काय आणि खोटं काय, याची जाणीव आहे. हनुमान चालिसेचा गैरवापर आणि चांदीचं नाणं वाटणाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांनी मतदान केलं आहे”, अशी टीका यशोमती ठाकूर यांनी केली होती. तसेच “रवी राणा यांच्या पक्ष हा व्यापाऱ्यांचा पक्ष आहे, त्यांना शेतकऱ्यांचं हित माहिती नाही. हनुमान चालिसेचा गैरवापर करणाऱ्यांना आणि रंग बदलणाऱ्यांना सरड्यांना शेतकऱ्यांनी धडा शिकवला आहे”, असंही त्या म्हणाल्या होत्या.