बुलढाणा : मातृतीर्थ सिंदखेडराजा ते विदर्भ पंढरी शेगाव दरम्यानच्या प्रस्तावित भक्ती महामार्गाच्या विरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा हा महामार्ग रद्द करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याउप्परही भूसंपादनाच्या नावावर बळजबरीने शेतकऱ्यांच्या सुपीक शेत जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तर रक्ताचे पाट वाहतील असा खळबळजनक इशारा तुपकर यांनी दिला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी किरण पाटील यांना दिलेल्या निवेदनाद्वारे त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. सिंदखेडराजा ते शेगाव या प्रस्तावित भक्तीमार्गाला शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. या प्रस्तावित मार्गावरील पंचेचाळीस गावातील शेतकऱ्यांनी या मार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे. या मार्गामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन होणार आहे. देऊळगाव राजा, चिखली, खामगाव आणि शेगाव तालुक्यातील लाखमोलाच्या सुपीक जमिनीवरून हा मार्ग प्रस्तावीत आहे. यामुळे किमान तीस टक्के शेतकरी भूमिहीन होणार आहे. कोणाचीही मागणी नसतांना शेतकऱ्यांच्या मुळावर उठणाऱ्या भक्ति मार्गाचा अट्टाहास का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याचे संसार उघड्यावर आणू नका, शेतकऱ्यांना भूमिहीन होण्यापासून वाचविण्यासाठी हा मार्ग रद्द करा, अशी मागणी रविकांत तुपकरांनी यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. आधीच समृद्धी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन झाले आहे. त्यात आता सरकार भक्तिमार्गाचा घाट करीत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात आम्ही आक्रमकपणे सहभागी असून जबरदस्ती शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याल तर रक्ताचे पाट वाहतील, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.

हेही वाचा – वर्धा : मुले हिरमुसली! शाळेच्या पहिल्या दिवशी नवा गणवेश मिळालाच नाही, योजनेचा फज्जा

हेही वाचा – Maharashtra Weather Update : सावधान! विदर्भात वादळी तर राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

का नकोचे हे आहे उत्तर

हा मार्ग का नको याचे उत्तरही तुपकर यांनी दिले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा ते शेगाव असा भक्तीमार्ग प्रस्तावित असून, १०९ किलोमीटरचा हा मार्ग आहे. जिल्ह्यातील देऊळगावराजा, चिखली, खामगाव व शेगाव तालुक्यातून हा मार्ग जाणार आहे. या मार्गावरील ४५ गावातील गावकरी व शेतकऱ्यांनी या मार्गाला विरोध दर्शविला आहे. तातडीने हा मार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी आंदोलनेही सुरु झाली आहे. वास्तविक पाहता सिंदखेडराजा ते शेगाव हे अंतर अंदाजे २४० किलोमीटर आहे. सिंदखेडराजा ते मेहकर समृद्धी महामार्गाचा उपयोग करून मेहकर एन्टरचेंजपासून शेगाव केवळ ३ तासांत पोहोचता येते. तसेच सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव, शेगाव हा पर्यायी मार्ग देखील उपलब्ध आहे. त्यामुळे भक्तीमार्गाची कुठल्याही प्रकारे कोणाचीही मागणी नाही. वास्तविक भक्ती महामार्गामुळे हजारो शेतकऱ्यांच्या सुपीक शेतजमिनी अदिग्रहित होणार आहेत. त्याचबरोबर अनेकांचे पक्के घर, विहिरीसुद्धा जाणार आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर भूमिहीन होण्याची वेळ येणार आहे. तसेच अनेक जन बेघर होणार आहेत. आधीच समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकरी भूमिहीन झाला आहे. त्यातच आता हा भक्तीमार्ग शेतकऱ्यांच्या माथी मारण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या भक्तीमार्गाला तीव्र विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या भावनांशी आम्हीही सहमत आहोत. शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देऊन भक्तीमार्ग उभा करणे उचित ठरणार नाही. त्यामुळे सदर प्रस्तावित भक्तीमार्ग तातडीने रद्द करून शेतकऱ्यांना भूमिहीन होण्यापासून वाचवावे, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा असून तातडीने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय न झाल्यास आम्ही देखील आक्रमकपणे रस्त्यावर उतरू, असा इशारा तुपकर यांनी दिला आहे. जबरदस्ती शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याल तर रक्ताचे पाट वाहतील असा सज्जड दम रविकांत तुपकर यांनी दिला आहे.