जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आत्मदहन आंदोलनात झालेला लाठीमार सुनियोजित षडयंत्रच होते. मला संपविण्याची सुपारी पोलिसांच्या माध्यमाने देण्यात आल्याचा गंभीर आरोप ‘स्वाभिमानी’ चे नेते रविकांत तुपकर यांनी येथे केला आहे. माझ्या जीवाला अजूनही धोका असल्याचे सांगतानाच शेतकऱ्यांसाठीची आमची लढाई थांबणार नसून आता खऱ्या अर्थाने लढाई सुरू होणार असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखविला. पुढील महिन्यात आयोजित जिल्हा व राज्यव्यापी संवाद यात्रेत आपण हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्याना उघडे पाडू असा इशाराही त्यांनी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>चंद्रपूर परिमंडळात वीज बिलांची थकबाकी ४९३ कोटींच्या घरात

चिखली मार्गावरील आपल्या निवासस्थानी आज मंगळवारी( दि २१) पार पडलेल्या पत्रकार परिषदेत तुपकर बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य शासन, सत्ताधारी पक्षाचे काही नेते, पोलीस विभागावर गंभीर आरोप करीत खळबळ उडवून दिली. ११ फेब्रुवारीला जिल्हा कचेरीसमोर आम्ही तीनेक तास शांततेत आंदोलन करीत होतो. शेतकरी व कार्यकर्ते यांनी संयम पाळून कायदा सुव्यवस्थेचा आदर केला. मात्र असे असताना पोलिसांनी अचानक बेछूट लाठीमार सुरू केला. शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या बळीराजाला दहशतवादी वा नक्षलवादी असल्यासारखे चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा लाठीमार म्हणजे सरकार व जिल्ह्यातील काही सत्ताधारी नेत्यांचे सुनियोजित षडयंत्र असल्याचा घणाघाती आरोप तुपकरांनी यावेळी केला. पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला संपविण्याची सुपारी काही अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. मी तुरुंगातून बाहेर आल्यावर या बाबी स्पष्ट झाल्या. आपल्याला आयुष्यातुन उठवायचे ‘काही सत्ताधारी नेत्यांचे कारस्थान होते असा घणाघात करीत आपल्या जीवाला अजूनही धोका असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा >>>देवासमोर नतमस्तक होणाऱ्या वाघासमोर क्रिकेटचा देव नतमस्तक होतो तेव्हा…

दडपशाही अस्त्र बुमऱ्यांग झाले
दरम्यान सत्ताधारी व काही नेत्यांना वाटले तसे झाले नाही. उलट हा लाठीमार व शासन, प्रशासनाची अमानुष दडपशाही त्यांच्यावर बुमऱ्यांग झाले. शेतकरीच काय सामान्य नागरिकांनाही यामागे कोण आहे, कुणाचे कारस्थान आहे हे माहित झाले. यामुळे लाखो शेतकरी पेटून उठले, ते आपल्या मागण्यासाठी अधिक जागृत झाले, पूढील लढ्यासाठी त्यांच्यात जिद्द निर्माण झाली. त्यामुळे लाठीमार घडवून आणणाऱ्याचे आम्ही आभारीच आहोत, असा टोला त्यांनी लगावला.

लवकरच राज्यव्यापी पोलखोल यात्रा
दरम्यान शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा कितीही प्रयत्न झाला आणि मला हजारदा तुरुंगात डांबले तरी बळीराजाची लढाई सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. पुढील महिन्यात आपण जिल्हा व राज्यव्यापी अश्या दोन संवाद यात्रा काढणार असून बहुतेक गावात पोहोचनार असून या लाठीमारासाठी जवाबदार असलेल्याना उघडे पाडणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावात ही नियोजित यात्रा पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravikant tupkar alleges that the lathi charge in the self immolation protest in front of the collector office was a well planned conspiracy scm 61 amy