बुलढाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी संघटनेच्या शिस्तपालन समितीसमक्ष उपस्थित राहण्याचे टाळले. त्याऐवजी त्यांनी समिती अध्यक्षा सह सर्वोच्च नेते राजू शेट्टी यांना लिखित स्वरुपात आपली भूमिका, व्यथा व आक्षेप मांडले आहेत.
यापूर्वी रविकांत तुपकर यांनी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वावर टीका टिप्पणी करून आक्षेप घेतले होते. आपले पंख छाटण्याचे प्रयत्न होत असल्याचे सांगितले. यानंतरही वेळोवेळी शाब्दिक हल्ले केले. दरम्यान समितीने त्यांना प्रारंभी ८ ऑगस्टला पुणे येथील बैठकीत हजर राहण्याचे बजावले. मात्र ते गैरहजर राहिल्याने नैसर्गिक तत्व न्यायाने पुन्हा एकदा संधी देऊन १५ ऑगस्टपर्यंत समितीसमोर उपस्थित राहून म्हणणे मांडण्यासाठी अवधी दिला होता. तुपकर समितीसमोर प्रत्यक्ष हजर झाले नाही. मात्र त्यांनी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासह समितीला सविस्तर पत्र पाठविले आहे.
हेही वाचा – सोने खरेदीची सुवर्णसंधी… दरात घसरण, नागपुरात आजचे दर पहा
काय आहे पत्रात?
या पत्राच्या माध्यमातून आपल्या व्यथा, आक्षेप त्यांनी सविस्तरपणे व्यक्त केले आहेत. राजू शेट्टी यांना आपण ४-५ वर्षांपासून आपले म्हणणे वारंवार सांगत आलेलो आहे. शिवाय शिस्तपालन समितीचे तत्कालीन अध्यक्ष यांच्याशीही यापूर्वी फोनवरून सविस्तर चर्चा झालेली आहे. वारंवार तेच ते म्हणणे कितीवेळा मांडणार अशी भूमिका घेत तुपकर यांनी हा पत्र प्रपंच केला आहे. राजू शेट्टी यांना दिलेल्या पत्रात सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या काळातील घडामोडींचा व संघटनेच्या कार्याचा उल्लेख आहे. शिवाय विविध आंदोलने, तुपकरांसह त्यांच्या सहकाऱ्यांवर दाखल झालेले शेकडो गुन्हे, पोलिसांचा लाठीमार, तडीपारी, तुरुंगवास असा चळवळ आणि राजकीय प्रवासाचा पत्रात उल्लेख आहे. या आपल्या एकट्याच्या नव्हे तर राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या सामूहिक भावना असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा – एमपीएससीमार्फत राज्य दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संवर्गातील ८२३ जागांसाठी पदभरती!
समितीच्या भूमिकेकडे लक्ष!
प्रत्येक निवडणुकीत राजू शेट्टी यांची बदलती राजकिय भूमिका आणि त्याचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेला परिणाम याचा तपशील त्यांनी मांडला आहे. संघटनेच्या कार्यपद्धतीवर असलेला आक्षेप यासह इतर बाबी पत्रात नमूद असल्याचे कळते. ९ ते १० पानांच्या या पत्रात तुपकरांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांच्या भावना आणि व्यथा नमूद केल्याचे कळते. आता राजू शेट्टी व शिस्तपालन समिती तुपकरांच्या आक्षेपांबाबत काय भूमिका घेते याकडे लाखो कार्यकर्ते व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.