सोयाबीन-कपाशी उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता येत्या ११ फेब्रुवारी रोजी बुलढाणा किंवा मुंबईत आत्मदहन करण्याची घोषणा केल्यावर शेतकरी नेते रविकांत तुपकर भूमिगत झाले आहे. दरम्यान, बुलढाणा पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे. तुपकरांनी मात्र संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगत आता शहीद झालो तरी माघार घेणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे.
हेही वाचा >>>वर्धा: शरद पवार यांच्या नियोजित वर्धा दौऱ्यावरून मोहिते व सहकार गटात भडका!
पीकविमा, अतिवृष्टीची रखडलेली मदत आणि सोयाबीन-कापूस दरवाढ यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शनिवार, ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय किंवा एआयसी पीकविमा कंपनीच्या ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’, मुंबई येथील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी ७ फेब्रुवारीला जाहीर केले. यानंतर ते भूमिगत झाले आहे. मात्र, ते आपल्या भूमिकेवर कायम असून आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, आरपारची लढाई लढण्याचा त्यांचा निर्धार कायम असल्याचे ‘स्वाभिमानी’च्या वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले आहे.