बुलढाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वावर निशाणा साधणाऱ्या व मागील अनेक तासापासून ‘ नॉट रिचेबल’ असणाऱ्या रविकांत तुपकर यांनी आज मंगळवारी आयोजित शिस्त पालन समितीच्या बैठकीला हजर न राहण्याचा निर्णय घेतला! आपले म्हणणे मी वारंवार राजू शेट्टी यांच्यासह अन्य नेत्यांसमक्ष मांडले आहे. यामुळे आता निर्णय नेतृत्वाला घ्यायचा असे सूचक विधान करून आपण संघटनेतच राहून काम करणार आहोत. मी अन्य पक्षात जाणार या केवळ अफवाच असल्याचे त्यांनी सांगितले.
आज मंगळवारी सकाळी बुलढाण्यात निवडक प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली. मी मागील पाच वर्षांत शेट्टीसाहेब व अन्य नेत्यांकडे माझे गाऱ्हाणे मांडले. माझे आक्षेप, नाराजी पक्ष नेतृत्वाबद्धल आहेत, त्यांच्या कार्यपद्धती बद्धल आहेत. ते मी वारंवार मांडत आलो. ते माझे वैयक्तिक नव्हे तर अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. नेत्यांची कार्यपद्धती, संघटना एका टापू पुरती मर्यादित राहू नये हे माझे म्हणणे आहे. त्यामुळे आज पुण्यात आयोजीत शिस्त पालन समितीच्या बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. सोमवारी तसे नेत्यांना कळविले आहे.
हेही वाचा… चोरांची हिंमत वाढली! नागपुरात चक्क पोलिसाच्या घरी चोरी
संघटनेतच राहणार, अन्य पक्षात जाणार नाही
मी अन्य पक्षात जाणार, या केवळ राजकीय वावड्या असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. स्वाभिमानी मधेच राहणार असून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांच्या फळी उभारणार आहे. कार्यकर्त्यांची मोठी फोज उभारून दवाब गट तयार करणार आहे. माझ्या कोणत्याही निर्णयाने शेतकरी व शेतकरी चळवळीचे नुकसान होणार नाही अशी ग्वाही तुपकरांनी यावेळी दिली.
आधी संपर्क क्षेत्रात, मग ‘नॉट रिचेबल’
यापूर्वी स्वाभिमानीच्या राज्यस्तरीय शिस्तपालन समितीने रविकांत तुपकर यांना नोटीस बजावली. ६ तारखेला संध्याकाळी त्यांना नोटीस प्राप्त झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यात त्यांना पुणे येथे आयोजित समितीच्या बैठकीला हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, तुपकर ५ ऑगस्टला नाशिक येथे आयोजित लग्न सभारंभास हजर राहण्यासाठी बुलढाणा येथून रवाना झाले. त्यानंतर दोन दिवस ‘संपर्क क्षेत्रात’ राहिल्यावर सोमवारपासून ते ‘नॉट रिचेबल’ झाले आहे. यामुळे त्यांच्या संभाव्य भूमिकेवरील चर्चाना ऊत आला आहे.
थेट नेतृत्वावर केला होता शाब्दिक हल्ला
यापूर्वी बुलढाण्यात झालेल्या बैठकीत रविकांत तुपकर यांनी थेट राजू शेट्टी यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवून निशाणा साधला होता. पक्ष नेतृत्व आपले पंख छाटण्याचे प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. जवळच्या माणसाने केसाने गळा कापला तर आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही. मात्र आपण ते करणार नाही. त्यातच भाजप नेते आशीष देशमुख यांनी त्यांना भाजपात येण्याचे आवाहन केले. यामुळे तुपकर काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.