लोकसत्ता टीम

बुलढाणा : क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर टाले यांना एक वर्ष तडीपार करण्यासाठी केवळ आणि केवळ केंद्रीय राज्य मंत्री प्रतापराव जाधव जवाबदार आहे. त्यांच्या राजकीय दवाबामुळे मेहकर ‘एसडिओ’ यांनी ही कारवाई केली आहे. सुडाचे राजकारण करणारे मंत्री जाधव यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्याच्या मागणीसाठी आपण सर्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार असल्याची घोषणा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे.

बुलढाणा येथील शासकीय विश्राम भवनात आज सोमवारी, दहा मार्च रोजी तुपकर यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधी समवेत संवाद साधला. यावेळी बोलताना या शेतकरी नेत्याने नव्याने एका आगळ्या वेगळ्या आंदोलनाची घोषणा करून जिल्ह्यासह राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या तडीपार कारवाई मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व त्यांच्या अख्त्यारितील गृह विभागाला बदनाम करण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केली. यावेळी बोलताना क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपाकर यांनी केंद्रीय मंत्री जाधव यांच्यावर टिकेची झोड उडविताना त्यांच्यावर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या.

मंत्री जाधव हे खुनशी स्वभावाचे राजकारणी असून त्यांनी अधिकाऱ्यावर राजकीय दवाब आणून टाले यांना तडीपार केले आहे. मागील लोकसभा निवडणुकीत मला अपक्ष म्हणून अडीच लाख मते मिळाली, जाधवांच्या मेहकर विधानसभा मतदारसंघात युती आणि आघाडीच्या बरोबरीने मतदान झाले. यामध्ये टाले यांचा मोठा वाटा होता, त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यावर दवाब आणून तडीपार केले. एक गुन्हा सोडला तर टाले यांच्यावरील इतर गुन्हे राजकीय स्वरूपाचे, शेतकरी आंदोलनाचे आहेत. जिल्ह्यात अनेक जणावर विस विस गुन्हे आहेत, पण त्यांच्यावर कारवाई होत नाही असे सांगून फडणवीस यांच्या गृह खात्याला बदनाम करण्याचा यामागे डाव असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

सर्व भानगडी बाहेर काढणार

केंद्रीय मंत्र्यांनी अफाट माया जमा केल्याचे सांगून त्यांना ईडी ची भीती होती. त्यांच्या सर्व भानगडी आपण बाहेर काढणार असा इशारा देऊन मंत्र्यांना साठ देणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांच्या भानगडी देखील आपण चव्हाट्यावर आणणार असा सज्जड दम देखील तुपकरांनी दिला. टाले यांची तडीपारी म्हणजे, माझ्या विरोधात काम केले तर मी काय करू शकतो हे दाखविण्याचा त्यांचा हेतू आहे. त्यांना बुलढाण्याचा बीड जिल्हा करायचा का? असा सवाल त्यांनी विचारला.

मुंबईत आंदोलन

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना येत्या १९ मार्च रोजी मुंबईत आंदोलन छेडणार असल्याची घोषणा देखील तुपकर यांनी यावेळी केली. यावेळी आपण अरबी समुद्रात सोयाबीन आणि सातबारे बुडविणार असल्याचे ते म्हणाले. अठरा तारखेला आपण शेकडो कार्यकर्ते, शेतकऱ्यांसह मुंबईकडे कुछ करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व अधिकाऱ्यांचे राजीनामे घ्या अन्…

दरम्यान यावेळी तूपकर यांनी केंद्रीय मंत्र्यांची खिल्ली उडविली. टाले यांची तडीपारी म्हणजे गृह खात्याला बदनाम करण्याचा डाव असून याचे खापर गृह खात्यावर फुटणार. यामुळे यामागे युतीतील अंतर्गत सत्ता संघर्ष सुद्धा असण्याची शक्यता असल्याचे ते म्हणाले. सत्तेच्या दुरुपयोग होत असल्याचे सांगून एस डिओ, सर्व ठाणेदार, यांचे राजीनामे घेऊन त्याचा प्रभार आणि जिल्हाधिकारी पदाचा प्रभार देखील जाधव यांच्याकडे दयावा अशी मागणी आपण मुख्यमंत्र्याकडे करणार असल्याचे रविकांत तुपकर म्हणाले.

Story img Loader