लोकसत्ता टीम
बुलढाणा : मुंबईत आज, बुधवारी पार पडलेल्या उच्चस्तरीय शासकीय बैठकीत बहुतांश मागण्या मान्य झाल्याने आणि उर्वरित मागण्यांची पूर्तता महिनाभरात करण्याचे ठोस आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आपले मंत्रालय ताब्यात आंदोलन मागे घेतले आहे. यावेळी तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलनही मागे घेतले.
उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदारद्वय राजेंद्र शिंगणे, संजय कुटे आणि तुकाराम मुंडे, अनुप कुमार यांच्यासह विविध विभागाचे सचिव उपस्थित होते. तुपकरांनी मांडलेल्या बहुतांश मागण्या सरकारने मान्य केल्या. सोयाबीन-कापूस प्रश्नाबाबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत येत्या आठ दिवसांत दिल्लीत बैठक बोलावली जाणार आहे. बैठकीला तुपकरदेखील उपस्थित राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना तुपकर म्हणाले की, सरकारशी सकारात्मक चर्चा झाली आहे. काही मागण्या पंधरा दिवसांत, काही मागण्या महिनाभरात मार्गी लावण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.
आणखी वाचा-भाचीच्या लग्नावरून परतताना अपघात, निवृत्त शिक्षकाचा पत्नीसह मृत्यू
शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळ
शेतमजुरांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकीत केली. या महामंडळामार्फत शेतमजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा व आजाराचा खर्च केला जाणार आहे.