अविष्कार देशमुख

देशपातळीवरील परीक्षा म्हटले की परीक्षार्थींसमोर इंग्रजी-हिंदी भाषेशिवाय अन्य पर्याय नसायचा. मात्र, आता राज्य सरकारच्या पाठपुराव्यामुळे रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ‘हजेरीसहायक’ या पदासाठीच्या परीक्षेत पहिल्यांदाच मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

‘आरबीआय’ने ८४१ हजेरीसहायक या पदांची भरती प्रक्रिया राबवण्याची मंजुरी अलीकडेच दिली. त्यापैकी मुंबई विभागात २०२ आणि नागपूर विभागात ५५ पदांची भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. या सर्व परीक्षार्थींना मराठीतून परीक्षा देता येईल.

परीक्षार्थींनी केंद्रीय स्तरावरील परीक्षा मराठीतून घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत राज्य सरकारच्या मराठी विभागाने मराठीतून परीक्षा घेण्याची विनंती केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले आहे. ‘आरबीआय’मधील हजेरीसहायक या पदाची परीक्षा मराठीमधून देण्याची संधी महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थींना मिळणार आहे. हजेरीसहायक पदाची परीक्षा ऑनलाइन होणार आहे. ही परीक्षा १२० गुणांची असून परीक्षार्थींना ९० मिनिटे मिळतील. भाषा प्रावीण्य चाचणी परीक्षा ९ व १० एप्रिल रोजी देशातील १७३ परीक्षा केंद्रांवर होईल.

मराठीसह अन्य १६ भाषांतून ही परीक्षा होणार आहे. मराठी आणि कोंकणी भाषेतून परीक्षा देण्याची संधी मिळणार असल्याने परीक्षार्थींनी समाधान व्यक्त केले.

परीक्षा केंद्रे नागपूर विभागात नागपूर, अमरावती आणि चंद्रपूर येथील केंद्रावर ही परीक्षा होईल. तसेच मुंबई विभागात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सातारा केंद्रांवर परीक्षा होईल.

Story img Loader