गडचिरोली : उच्च दर्जाच्या लोह खनीजामुळे केवळ राज्यातच नव्हे तर देशात चर्चेचा विषय ठरलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड लोह खाणीचा पुन्हा विस्तार प्रस्तावित असून जानेवारी महिण्यात यासंदर्भात पर्यावरण विषयक जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. सध्या या खाणीतून वर्षाला एक कोटी टन लोह खनिज उत्खनन करण्यात येत आहे. विस्तारानंतर सहा कोटी टन इतके उत्खनन प्रस्तावित आहे. यामुळे खाण परिसरातील तब्बल ३१ गावे प्रभावित होणार आहे. या सोबतच कोनसरी येथील कारखान्याचा देखील विस्तार करण्यात येणार आहे.
स्थानिक आदिवासी आणि नक्षलवाद्यांचा विरोध झूगारून गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात येत असलेल्या सूरजागड टेकडीवर गेल्या तीन वर्षांपासून ३४८ हेक्टर परिसरात लोह खनिज उत्खनन सुरू आहे. लॉयड मेटल्स या कंपनीला सदर खाणीचे कंत्राट असून या कंपनीने चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे कारखाना देखील सुरु केला आहे. साध्यस्थितीत या कारखान्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. मागील वर्षी सुरजागड टेकडीवरील ४५०० हेक्टर खाण पट्ट्याचे चार मोठ्या कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. परंतु त्यांनी अद्याप उत्खनन सुरू केलेले नाही. लॉयड मेटल्स कंपनीकडून याठिकाणी वर्षाला एक कोटी टन लोह खनिज उत्खनन सुरू आहे. येत्या काळात कंपनी ही क्षमता वाढवून सहा कोटी टन इतकी करणार आहे. मात्र, यामुळे खाण परिसरातील पुन्हा तब्बल ३१ गावांना प्रदूषणाचा फटका बसणार आहे. यासाठी २८ जानेवारी २०२५ रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पर्यावरण विषयक जनसुनावणी ठेवण्यात आली आहे. सत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवणार अशी घोषणा केली होती. त्यामुळे प्रस्तावित विस्तार याच योजनेचा भाग असल्याची चर्चा आहे. लोह खनिजावर आधारित उद्योगांमुळे गडचिरोलीतच नव्हे तर पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यात आर्थिक उन्नती व रोजगार निर्मिती होईल, असा सरकारचा दावा आहे. मात्र, याला पुन्हा एकदा स्थानिकांचा विरोध होऊ शकतो.
हेही वाचा >>>Wardha Tiger News : वाघीण आणि तीन बछडे; प्राण्यांचा फडशा, शेतकरी भयभीत, वीज पुरवठा बंद
असा होणार विस्तार
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर ३४८ हेक्टर क्षेत्रात सध्या ३ दशलक्ष टन प्रतिवर्ष हेमॅटाईट (लोह) उत्खनन मे. लॉयड मेटल्स अँड एनर्जी लि. या कंपनीमार्फत केले जात आहे. त्याची क्षमता १० ते २६ दशलक्ष टन प्रतिवर्ष वाढविण्यात येणार आहे. यासोबतच ४५ लक्ष टन प्रतिवर्ष बीएचक्यू , ५ दशलक्ष टन प्रतिवर्ष घनकचरा असे एकूण ६० दशलक्ष म्हणजेच सहा कोटी टन उत्खनन करण्यात येईल. यासह सुरजागड लोह खाण लीज क्षेत्रावरील क्रशिंग व स्क्रिनिंंग प्रकल्पासह लोह खनिज उत्पादनक्षेत्राचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>>वर्धा : डॉ. इंद्रजीत खांडेकर राज्य वैद्यकीय परिषदेवर, रुग्णांना न्याय मिळणार…
हेडरी,बांडे,पुरसलगोंदी येथे ४५ दश लक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचे कमी दर्जाचा लोह खनिज (बीएचक्यू) लाभदायक प्रकल्प प्रस्तावित आहे. यामुळे एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी, नागुलवाडी, बांडे, मल्लमपाड, मंगेर, सुरजागड, हेडरी, एकरा (खु.), कारमपल्ली, पेठा (स.), झारेगुडा, कुदरी, मोहर्ली, बांडे, गोडेल, इतलनार, नेंडेर, रेकणार, आलदंडी, परसलगोंदी या गावांना प्रदूषणाचा फटका बसणार आहे.
कोनसरी कारखान्याचाही विस्तार
चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथील लोह निर्मिती(कारखाना)प्रकल्पाचे विस्तारीकरण होणार आहे. ६२ हजार ७०० टन प्रतिवर्ष ते ९२ हजार ४०० टन प्रतिवर्ष डीआरआय ,आयर्न व ग्राईंडींग युनीट, १०.० दशलक्ष टन प्रतिवर्ष चिकनिंग आणि फिल्ट्रेशन युनिट सोबतच ४.५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमतेचा अतिरिक्त एकीकृत स्टील प्रकल्प नियोजित आहे. यामुळे कोनसरी, जयरामपूर, मुधोली तुकूूम, मुधोली चक क्र. २, दुर्गापूर, सोमनपल्ली, चंदनखेडी, कढोली, अनखोडा (सर्व ता. चामोर्शी), बोधली (ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर) ही गावे प्रभावित होणार आहे. यासाठी २३ जानेवारी २०२५ रोजी कोनसरी येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.