‘लोकांकिका’ गाजवणाऱ्या कलावंतांची प्रतिक्रिया

सहज-सुंदर अभिनय हे कुठल्याही नाटकाच्या यशस्वीतेचे गमक असते. त्यामुळे भूमिकेत शिरून अभिनय केला. जे पात्र साकारले ते रंगमंचावर प्रत्यक्ष जगलो. म्हणूनच प्रेक्षकांना नाटक जिवंत वाटायला लागले, अशा शब्दात ‘लोकांकिका’ गाजवणाऱ्या कलावंतांनी आपल्या नाटय़प्रेमाची साक्ष दिली.

या स्पध्रेत स्मशानातील म्हाताऱ्याची भूमिका, ‘भाजी वांग्याची’मधील व्यसनी म्हाताऱ्याची भूमिका, अथांगमधील हृदय बिघडलेल्या १० वर्षांच्या मुलाच्या आईची भूमिका साकारणारी ‘पुष्पा’ आणि मनाला चटका लावणारी ‘घायाळ पाखरा’मधील बहुविकलांग मुलाची भूमिका करणारा विद्यार्थी या सर्वाचा अभिनय खरोखरच लक्षवेधी ठरला. अमरावतीच्या शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयाच्या ‘चला निघायची वेळ झाली’ या एकांकिकेतील स्मशानातील म्हाताऱ्याची भूमिका सौरभ शिवकुमार शेंडे याने साकारली. वय लहान पण अभिनय महान अशी त्याची ओळख ठरली. चालणे, बोलणे, अंगाचा थरकाप सर्व काही ज्येष्ठ नागरिकासारखा हुबेहूब होता. तो सांगतो, या भूमिकेसाठी सखोल अभ्यास केला तसेच लेखक आणि दिग्दर्शकाशी चर्चा केली. त्याचा चांगला परिणाम झाला. राष्ट्रीय ज्युनियर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली ‘भाजी वांग्याची’ मधील व्यसनी म्हाताऱ्याची भूमिका अभिजित आठवले या विद्यार्थ्यांने केली. सराव करताना ही भूमिका सुरुवातीला अवघड वाटली. पण, एकदा नाटक सुरू झाल्यानंतर सगळा ताण निवळला, असे अभिजितने सांगितले.

रोहित वानखेडे याने साकारलेली बहुविकलांगत्व असलेल्या मुलाची भूमिका प्रेक्षकांना फारच भावली. त्याच्या मते, अपंगांच्या समस्या ज्या २० वर्षांपूर्वी होत्या  त्याच आजही आहेत. त्यांच्या सोडवणुकीविषयी समाजात जागृती करणे हा देखील उद्देश ही एकांकिका करण्यामागे होता. रोहितची आई म्हणून काम करणारी साची तेलंग हिच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. ती म्हणाली, चार वर्षांपासून थिएटर करीत आहे. माझ्या भूमिकेला पाहिजे तसा न्याय देऊ शकले नाही. आता एका दिवसात संहिता अवगत करून ती सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. जी भूमिका वठवायची आहे तिच्यावर अभ्यास करणे फार गरजेचे आहे. अपंग मुलाच्या आईची भूमिका साकारताना तिची चिडचिड, राग, गोंधळलेपण, भावनिक ओलावा या भावनांचे मिश्रण असलेला अभिनय करायचा होता. तसा तो करण्याचा प्रयत्न केला.

‘बाकी सर्व ठीक आहे’मधील बुलकुंदे भाऊबहिणीचा अभिनय फारच उत्कृष्ट होता. कारण एका भूमिकेत फार वेळ राहता येत नव्हते. एकांकिका एकच असली तरी भूमिका वेगवेगळ्या होत्या. त्यामुळे एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत शिरणे तारेवरची कसरत होती. ती मात्र दोघांनीही उत्कृष्टरित्या साकारली. ललित कला विभागाच्या ‘अथांग’या एकांकिकेत लहान मुलाच्या आईची भूमिका साकारणारी प्रणाली राऊत हिचे काम फारच उत्कृष्ट ठरले. तिचे संवाद वा चेहऱ्याचे भावच बोलके नव्हते तर संपूर्ण देहबोली बोलकी होती. ती म्हणाली, नाटकाला चांगला दिग्दर्शक मिळणेही गरजेचे असते. अथांगमधील मुलाची आई विधवा, संघर्ष करणारी, असहाय तर कधी कणखर दाखवण्यात आली. मात्र मुलाच्या उपचारासाठी ती दीन झालेली असते. अशावेळी तिचे खांदेही झुकलेल्या स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रणालीने सांगितले.

प्रायोजक

सॉफ्टकॉर्नर प्रस्तुत, केसरी टूर्स आणि पितांबरी सहप्रायोजित, पॉवर्ड बाय इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या सहकार्याने ‘लोकसत्ता लोकांकिका २०१८’ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेचे टॅलेंट हंड पार्टनर ‘आयरिस प्रोडक्शन’ असून ‘एरेना मल्टिमीडिया’ हे स्पर्धेचे नॉलेज पार्टनर म्हणून काम पाहत आहेत. ‘अस्तित्व’च्या सहकार्याने रंगणाऱ्या लोकसत्ता लोकांकिका या स्पर्धेसाठी झी मराठी टेलिकास्ट पार्टनर आणि एबीपी माझा हे न्यूज पार्टनर आहेत.