साहित्यातून व्यक्ती आणि समाज संवेदनशील होत असतो, मात्र आता वाचन कमी होत आहे. युवा साहित्य संमेलनातून युवकांमध्ये वाचन अभिवृद्धी होणार आहे. संमेलन गीतातून युवकांमधील संवेदनेला साद मिळणार आहे, असे मत माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>>नागपूर : राणा- कडू वादावर नवनीत राणांचे मौन
विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राजस्तरीय युवा साहित्य संमेलन ५ व ६ नोव्हेंबर रोजी स्व. बाजीराव पाटील साहित्यनगरी प्रभात किड्स स्कूल येथे होणार आहे. त्यानिमित्त आयोजित संमेलनगीताचे विमोचन आणि मंडपपूजन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अकोला शाखाचे अध्यक्ष विजय कौसल, संमेलन स्वागताध्यक्ष संग्राम गावंडे, संमेलनाचे मुख्य कार्यवाह डॉ. गजानन नारे, संमेलनाच्या समन्वयक सीमा शेटे-रोठे, संमेलन सरचिटणीस अशोक ढेरे, संमेलन चिटणीस प्रा. डॉ. सुहास उगले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. युवा साहित्य संमेलनामध्ये असणारे कार्यक्रम आणि वैचारिक मंथन हे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांनाही अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. त्यामुळे या सर्वांनी युवा साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. दोन दिवसीय साहित्य संमेलनातील साहित्य, समाज आणि सांस्कृतिक मंथनातून तरुणाईला बळ मिळणार असल्याचे डॉ. पाटेकर यांनी नमूद केले.
युवा साहित्य संमेलनातून युवकांच्या प्रतिभेला चालना मिळावी, या दृष्टीने साहित्य-कला-संस्कृतीने परिपूर्ण उपक्रमांची रेलचेल राहणार असून संमेलनाच्या माध्यमातून संवेदना जागृतीचे काम होणार असल्याचा आशावाद युवा साहित्य संमेलनाचे कार्यवाह डॉ. गजानन नारे यांनी त्यांच्या प्रास्ताविकातून व्यक्त केला. यावेळी संमेलनगीताचे रचियेता कवी किशोर बळी तथा गायकवृंदांचा हृद्य सत्कार करण्यात आला. संमेलनाचे सहकार्यवाह डॉ. विनय दादंळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाला विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेचे पदाधिकारी आणि संमेलन सहयोगी विविध संस्थांचे पदाधिकारी व साहित्यिक उपस्थित होते.
हेही वाचा >>>अमरावती: ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी तिवसा येथे काँग्रेसचे ‘रास्ता रोको’
संमेलनगीतातून जागणार साहित्याचे भान!
महाराष्ट्राच्या संस्कृतीचा-प्रतिभेचा आणि कर्तृत्वाचा आलेख मांडणाऱ्या संमेलनगीतातून युवकांना साहित्याचे भान मिळणार आहे. कवी किशोर बळी यांनी रचलेल्या गीतास अभिजित भोसले यांचे संगीत लाभले असून प्रज्योत देशमुख, विजय वाहोकार, अतुल डोंगरे, सीमा इंगळे, रश्मी देव यांनी स्वरसाज चढवला, तर संपूर्ण गीताचे संयोजन ॲड. वल्लभ नारे यांनी केले.