लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : महात्मा गांधी यांना जागतिक मान्यता लाभली आहे. आजही विविध देशातील अभ्यासक गांधी समजून घेण्यासाठी भारतात येतात. गांधींना कमी लेखल्याने त्यांचे महत्त्व कमी होत नाही. त्यामुळेच गांधींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विधान महत्त्व देण्यासारखे नव्हते. म्हणूनच त्यावर सयंत प्रतिक्रिया उमटल्या, असे मत गांधीविचारक व काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केले.

निवडणूक प्रचार काळात एका मुलाखतीत मोदी यांनी ‘‘महात्मा गांधींना आधी कोणीही ओळखत नव्हते. ‘गांधी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर उर्वरित जगात त्यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली.’’ असे मत मांडले होते. ऐन निवडणूक काळात मोदींनी गांधींबाबत केलेल्या या विधानावर काँग्रेस आणि गांधीवाद्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटतील, असा अंदाज होता. मात्र काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींसह इतर नेत्यांनी त्यावर संयत प्रतिक्रिया दिल्या. काँग्रेसकडून आक्रमकपणे याचा विरोध झालेला दिसला नाही. मात्र काँग्रेस नेते व गांधीवादी प्रफुल्ल गुडधे आणि संदेश सिंगलकर यांनी हा आरोप फेटाळून लावला. गांधींचे महत्त्व जगाने मान्य केले आहे. कोणी त्यांना कमी लेखल्याने त्यांचे महत्त्व कमी होत नाही. मोदींच्या विधानाचा तर त्याला महत्त्व देण्याइतकेही ते गंभीर नाहीत. पक्षाचे नेते राहुल गांधी व अन्य वरिष्ठांनी मोदींना उत्तर दिले आहे. मोदी काहीही बोलतात, त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही, असे मत या नेत्यांनी मांडले.

आणखी वाचा-नैसर्गिक आपत्तीमुळे बियाणे उत्पादन घटले! मागणीच्या तुलनेत कंपनीकडून अल्पपुरवठा; शेतकऱ्यांचे प्रचंड हाल

” भारतीय जनता पक्षाचे महात्मा गांधी यांच्याबाबतचे मत काय आहे हे सर्वश्रूत आहे. त्यांच्या मान, सन्मानाने गांधींचे महत्त्व कमी किंवा जास्त होत नाही. त्यांना जगमान्यता लाभली आहे. त्यामुळे मोदींनी केलेल्या सुमार वक्तव्याला अधिक महत्त्व देण्याची गरज नाही.’’ -प्रफुल्ल गुडधे, काँग्रेस नेते, नागपूर.

” सामान्य भारतीयांच्या मनावर एकेकाळी सिनेमाचा खूप प्रभाव होता हे मान्य, पण महात्मा गांधी यांची ओळख त्यांच्यावरील सिनेमा निघाल्यानंतर झाली ही वस्तुस्थिती नाही. पूर्वी बहुतेक सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये २ ऑक्टोबरला गांधी जयंती आणि ३० जानेवारी रोजी शहिदांना श्रद्धांजली म्हणून सकाळी ११ वाजता भोंगा वाजायचा व सर्व उभे राहून सन्मान द्यायचे. त्यामुळे गांधी निश्चितच माहिती होते. एक मात्र खरे की, एटनबेरो यांना गांधींवर चित्रपट निर्माण करावासा वाटला तसा, तेवढा भव्य चित्रपट आपल्या इथल्या कुणीही त्यापूर्वी बनवला नाही आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलाही नाही. यावर आपण विचार केला पाहिजे.’’ -डॉ. अपरूप अडावदकर, प्राध्यापक, गांधी विचारधारा, नागपूर विद्यापीठ.

‘‘१९३७ पासून जगप्रसिद्ध टाईम्स मॅगझिनमध्ये अनेकदा गांधींचे चरित्र प्रकाशित झाले. १५४ देशात गांधींचे पुतळे आहेत. अनेक देशातील विद्यापीठातून गांधी शिकवले जातात. गांधी विचारधारा शिकण्यासाठी अनेक देशांतील विद्यार्थी भारतात येतात. अशा नेत्यांची ओळख एका चित्रपटामुळे झाली असे कोणी म्हणत असेल तर त्याला महत्त्व देण्याचे कारण नाही.’’ -संदेश सिंगलकर, सचिव, प्रदेश काँग्रेस.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reasons given by congress leaders for ignoring pm narendra modis statement about gandhi cwb 76 mrj