अमरावती : अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने ठाकरे गटाचे बुलढाण्याचे माजी जिल्हा प्रमुख धीरज लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लिंगाडे यांनी मंगळवारी रात्रीच ठाकरे गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या नाट्यमय घडामोडींनंतर काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण फडकले आहे. काँग्रेसच्या पदवीधर सेलचे अध्यक्ष श्याम जगमोहन प्रजापती यांनी बंड करत आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता प्रजापती यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. त्यांच्यासोबतच माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, माजी महापौर मिलिंद चिमोटे, अकोल्याचे डॉ. सुधीर ढोणे, यवतमाळचे डॉ. महेंद्र लोढा, भैयासाहेब मेटकर यांनीही उमेदवारी मागतल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. मात्र, काँग्रेसने बुलढाण्याचे शिवसेनेतून आलेल्या लिंगाडे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसमधील एक गट या निर्णयाने नाराज झाला असून अंतर्गत कलहाला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा >>> अमरावती : नाट्यमय घडामोडी! अमरावती पदवीधर मतदारसंघातून धीरज लिंगाडे काँग्रेसचे उमेदवार
प्रजापती यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा बुधवारी शहराध्यक्ष बबलू शेखावत यांच्याकडे पाठवला आहे. या राजीनामा पत्रात त्यांनी, पदवीधरांचे प्रश्न आपण शासन दरबारी मांडून सोडवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केला. मात्र आपण काही कारणास्तव राजीनामा देत असल्याचे नमूद केले. मी काँग्रेसचा प्रामाणिक कार्यकर्ता असून शेवटपर्यंत काँग्रेसच्या विचारांशी प्रामाणिक राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा >>> नागपूरमध्ये ‘शिक्षक’ मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाहीच, परिषदेच्या गाणार यांना पाठिंबा
सुरुवातीला अमरावती पदवीधर मतदार संघासाठी काँग्रेस तर्फे माजी राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या नावाची चर्चा होती. त्यानंतर मिलिंद चिमोटे यांचे नाव चर्चेत आले. दोघांनीही उमेदवारीसाठी नकार दिल्याची माहिती आहे. काँग्रेसतर्फे कोणाचे नाव जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. धीरज लिंगाडे यांचे नाव अनपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. अकोल्याचे डॉ. सुधीर ढोणे यांना तर तीन महिने आधीच कामाला लागण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले होते. पण ही सर्व नावे अचानक मागे पडली आणि काँगेसने अनपेक्षितपणे धीरज लिंगाडे यांची उमेदवारी जाहीर केली. शिवसेनेने अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी दीड वर्षाआधीपासूनच तयारी सुरू केली होती.
हेही वाचा >>> “आदित्यच्या बापाचेच पद…”, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
शिवेसनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई यांनी मतदार नोंदणी, बैठकांसह इतर गोष्टींच्या सर्व जबाबदाऱ्या धीरज लिंगाडे यांच्याकडेच दिल्या होत्या. यातून लिंगाडे हेच शिवसेनेचे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार असतील, असे संकेत दिले होते. राज्यातील सत्तांतरानंतरही लिंगाडे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली नाही. पण अमरावतीची जागा काँग्रेसकडे असल्याने अखेर शिवसेनेने आपला उमेदवार काँग्रेसच्या कोट्यात दिला आहे. धीरज लिंगाडे यांना महाविकास आघाडीकडून काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. यामुळे आता भाजपचे उमेदवार डॉ रणजीत पाटील व धीरज लिंगाडे यांच्यात थेट लढत होणार, असे मानले जात आहे.
विचारांनी काँग्रेसमध्येच – प्रजापती
काँग्रेस पदवीधर सेलच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. शहराध्यक्षांनी तो राजीनामा स्वीकारावा, अशी विनंती केली आहे. केवळ पदाचा राजीनामा दिला असला तरी मनाने आणि विचाराने आपण काँग्रेसमध्ये आहोत, अशी प्रतिक्रिया श्याम प्रजापती यांनी दिली आहे. लवकरच आपण सहयोगी संघटनांच्या मदतीने पदवीधर मतदार संघाची निवडणूक अपक्ष लढणार असल्याचेही प्रजापती यांनी म्हटले आहे. तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये समन्वय – लिंगाडे मी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल करणार असलो तरी महाविकास आघाडीचाच उमेदवार आहे. आमच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये समन्वय आहे’, असे धीरज लिंगाडे यांनी सांगितले आहे.