नागपूर: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पमध्ये वाघाचे दर्शन झाल्याने या व्याघ्रप्रकल्पात वाघाच्या स्थलांतरणाचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. नुकतेच वन विभागास सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील जंगल परिसरात १२ डिसेंबरला वाघाच्या पायाचे ठसे मिळाले. ही बाब गस्ती करणाऱ्या वनरक्षक व वनमजूर याला लक्षात येताच त्यांनी तातडीने ही बाब वनक्षेत्रपाल यांना कळवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुढे तीन दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पायांचे ठसे व विष्टा सापडली. या जंगल परिसरातील वनविभागाने लावलेले कॅमेरा ट्रॅपची तपासणी केली असता दिनांक १७ डिसेंबरला पहाटे ४.५९ वाजता वाघाचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद झाले असल्याचे निदर्शनास आले. २०१४ मधील गणनेनुसार सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन वाघ आढळल्याच्या नोंदी आहेत. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पाचा भाग असलेल्या राधानगरी अभयारण्यात २३ एप्रिल २०२२ ला लावलेल्या कॅमेरा ट्रॅप मध्ये पूर्ण वाढ झालेल्या वाघांचे छायाचित्र आले होते.तर यापूर्वी २०२१ मध्ये त्याठिकाणी वाघाचे छायाचित्रण झाले होते. सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ नाही. पण येथे वाघाचे अस्तित्व राहिले आहे. ते कायमस्वरुपी असावे यासाठी आता राज्याच्या वनखात्याने पावले उचलली आहेत.

हेही वाचा… ‘एम्स’मध्ये लवकरच हृदय प्रत्यारोपण! तिरूपतीच्या संस्थेसोबत सामंजस्य करार

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधीकरणाने त्यावर शिक्कामोर्तब केले असून लवकरच या व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना व्याघ्रदर्शन होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आठ वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सोडण्याची परवानगी वनखात्याने मागितल्यानंतर नुकतेच प्राधिकरणाने ही परवानगी दिली आहे. या प्रकल्पासाठी प्राधिकरणाकडून १०.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विदर्भातील पाच व्याघ्रप्रकल्पांच्या तुलनेत या व्याघ्रप्रकल्पासमोर नैसर्गिक आव्हानांसोबतच व्यवस्थापनाचे मोठे आव्हान आहे. पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ सामावून घेण्याची क्षमता असतानाही येथे वाघ स्थिरावू शकले नाहीत. कोयना आणि चांदोली या दोन अभयारण्यांचा समावेश सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात आहे. या व्याघ्रप्रकल्पात वाघ स्थिरावण्याऐवजी येतात आणि जातात. साधारणपणे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत याठिकाणी वाघांच्या हालचाली दिसून येतात. नैसर्गिक संरचना आणि अपुरे मनुष्यबळ हेदेखील वाघ न स्थिरावण्यामागील एक कारण आहे. आता याठिकाणी पुन्हा एकदा वाघाचे अस्तित्व दिसून आल्यामुळे याठिकाणी वाघ सोडण्याचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा वन्यजीव अभ्यासकांमध्ये आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recently the forest department found the footprints of a tiger in the forest area of the sahyadri tiger reserve nagpur rgc 76 dvr