राखी चव्हाण
‘मी लोणारकर’च्या मोहिमेला यश
जगप्रसिद्ध लोणार सरोवर परिसरातील मध्ययुगीन व हेमाडपंथीय मंदिरांच्या जीर्णोद्धाराला भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने हिरवा कंदील दाखवला आहे. या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी विभागाने पाठवलेल्या प्रस्तावानुसार पहिल्या पाच मंदिरांच्या जीर्णोद्धाराचे काम लवकरच सुरू होणार आहे. तरीदेखील या वास्तूची सुरक्षितता हा येथील प्राथमिक मुद्दा आहे. कारण या ठिकाणी असलेल्या मंदिराच्या मोठमोठय़ा शिला चोरीला जाण्याचे प्रकार वाढत आहेत.
खगोल, भूगर्भ, जलविज्ञान अशा अनेक शास्त्रांच्या अभ्यासाचे केंद्र ठरलेले लोणार सरोवर वन, महसूल, पर्यटन अशा खात्यांच्या चक्रव्यूहात अडकले होते. एवढा मोठा अनमोल ठेवा संरक्षण व संवर्धनाच्या कात्रीत होते. सरोवराच्या काठावर १५ आणि परिसरात मिळून २१ मंदिरे आहेत. ती पौराणिक आणि मध्ययुगीन शिल्पकलेचा सवरेत्कृष्ट नमुने आहेत. मात्र, विविध खात्यांच्या लालफितीच्या कारभारात अडकल्यामुळे सरोवर आणि परिसरातील मंदिरांचा विकास होऊ शकला नाही.
दशकभरापूर्वी सरोवराचे पाणी खूप जास्त वाढल्यामुळे मंदिरात घुसले. त्याचा विपरीत परिणाम मंदिरांवर झाला. गेल्या दोन वर्षांपासून लोणार सरोवराच्या संरक्षण व संवर्धनासाठी काम करणाऱ्या ‘मी लोणारकर’ चमुने याचा पाठपुरावा केला. त्यांच्यामुळेच भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे लक्ष्य या विषयाकडे गेले. त्यांनी सरोवर परिसरातील १५ मंदिरांच्या जीर्णोद्धाराचा प्रस्ताव तयार केला. त्यातील पाच मंदिरांचा प्रस्ताव मान्य झाला असून लवकरच त्याचे काम सुरू होणार आहे.
लोणार सरोवराच्या इतिहासाबरोबरच येथील मंदिरांचाही इतिहास मोठा आहे. मात्र, ही मंदिरे दुर्लक्षित आहेत. खडकांवर खडक रचून तत्कालीन वास्तुशास्त्रानुसार बांधलेल्या मंदिरांचे खडक ढासळत असल्साने ते चोरून घराच्या बांधकामात वापरण्याचे प्रकारे मोठय़ा प्रमाणात वाढीस लागले आहेत. ‘मी लोणारकर’च्या चमुने दोन वर्षांपासून या ठिकाणी दोन गोष्टींची जाणीव प्रशासनाला वारंवार करून दिली. या सर्वामध्ये दैत्यसुदन मंदिर हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. या मंदिरासाठी सुरक्षितता नावाचा प्रकार नाही. भारतीय पुरातत्त्व विभागाला वारंवार निवेदने पाठवण्यात आली पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या ठिकाणी पूर्व आणि उत्तर बाजूला भव्य प्रवेशद्वार आणि पायऱ्या आहेत. मात्र, त्यावर माती आणि मुरूम यांचा मोठा थर आहे. त्यामुळे सर्वात आधी त्याचे उत्खनन करणे आवश्यक आहे. ते केले तर बरेच काही हाती लागू शकेल, असा विश्वास ‘मी लोणारकर’च्या चमूला आहे.
धारसमूहाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. शनिवार, रविवारी पर्यटकांची संख्या पाच हजाराहून अधिक असते. पण येथे पर्यटकांसाठी ना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, ना शौचालयांची. या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढेल. सुरक्षेसाठी सर्वात आधी प्रवेश शुल्क घेण्याची गरज आहे. तसे केले तरच हा परिसर सुरक्षित राहील आणि पर्यटकांना शिस्तही लागेल. नाममात्र प्रवेश शुल्क घेतले तरीही स्थानिक प्रशासनाकडे महसूल जमा होईल. त्याचा वापर या वास्तूच्या संरक्षण आणि संवर्धनसाठी करता येईल.
मौल्यवान ठेवा
सरोवर परिसरात रामगया, विष्णू, शंकर गणपती, वाघ महादेव, अंबरखाना, मुंगळ्या, देशमुख (वायुतीर्थ), चोपडा(सोमतीर्थ), वेदभाभा (यज्ञवेश्वर मंदिर), कुमारेश्वर, वारदेश्वर, हाकेश्वर अशी मंदिरे आहेत. शहर परिसरात दैत्यसुदन, ब्रह्मा-विष्णू-महेश, लिंबी वारव आणि अन्नछत्र अशा मंदिराचा मौल्यवान ठेवा आहे.
आम्ही प्रस्ताव पाठवला होता, तो मंजूर झाला. आम्ही त्यावर माहितीपट तयार केला आहे. इंटरप्रिटेशन सेंटर तयार करण्याचा आमचा विचार आहे. १५ मंदिरांपैकी पहिल्या पाच मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी मंजुरी मिळाली आहे. इतरही मंदिरांना लवकरच मंजुरी मिळेल. हा समृद्ध वारसा कशा पद्धतीने जपता येईल, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत.
– डॉ. इझार आलम हाश्मी, उपअधीक्षक पुरातत्त्व विभाग
मंदिराच्या जीर्णोद्वाराला सुरुवात होत आहे, हे स्वागतार्ह आहे. मात्र, त्याहीपेक्षा या ठिकाणी आधी बेकायदा होणारे प्रवेश आणि बेकायदा कृती रोखण्याची गरज आहे. एवढा मोठा समृद्ध वारसा आपल्याला लाभला असताना त्याच्या संरक्षण आणि संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. आम्ही आमच्या परीने प्रयत्न करीत आहोत आणि प्रशासनाकडूनही सहकार्याची अपेक्षा आहे.
– चमू ‘मी लोणारकर’