देवेश गोंडाणे
नागपूर : राज्यसेवा २०२० परीक्षेचा अंतिम निकाल मुलाखतीनंतर तासाभरात जाहीर करत स्वत:ची पाठ थोपटून घेणाऱ्या ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ने (एमपीएससी) स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ च्या अंतिम गुणवत्ता यादीनंतर पदभरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑप्टिंग ऑऊट) निवडणाऱ्या काही उमेदवारांची पुन्हा त्याच पदावर शिफारस केली आहे. एमपीएससीच्या या घोडचुकीमुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नोकरीची संधी हुकली आहे.
‘एमपीएससी’कडून शासकीय पदभरतीसाठी अनेक परीक्षा घेतल्या जातात. परीक्षांतील गुणवत्ता यादीद्वारे उमेदवारांची विविध पदांसाठी शिफारस केली जाते. मात्र, अपेक्षित पदावर शिफारस होत नसल्याने अनेक उमेदवार ती नियुक्ती स्वीकारत नाहीत. यामुळे ही पदे रिक्त राहतात. यावर उपाय म्हणून रिक्त राहणाऱ्या जागांवर पात्र उमेदवारांना संधी मिळावी, यासाठी ‘एमपीएससी’ने सर्वसाधारण गुणवत्ता यादी, पसंतीक्रम नोंदवणे आणि पदभरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ऑप्टिंग ऑऊट लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा २०१९ मधील काही उमेदवारांनी ‘ऑप्टिंग आऊट’चा पर्याय निवडूनही त्यांची पुन्हा त्याच पदावर शिफारस करण्याची चूक आयोगाने केली.
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ करिता आयोगातर्फे ४ ऑक्टोबर ते २ फेब्रुवारी या कालावधीमध्ये मुलाखती घेण्यात आल्या. मुलाखती संपताच आयोगाच्या संकेतस्थळावर गुणवत्ता यादी जाहीर करून उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्यासाठी २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. यापैकी आधीच शासकीय सेवेत असणाऱ्या काही उमेदवारांची अपेक्षित पदावर शिफारस न झाल्याने त्यांनी ‘ऑप्टिंग आऊट’चा पर्याय निवडला. १३ एप्रिलला आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये ‘ऑप्टिंग आऊट’मुळे रिक्त असणाऱ्या जागांवर प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळणे अपेक्षित होते. मात्र, तसे न होता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय निवडणाऱ्या उमेदवारांची विविध पदांवर शिफारस करण्यात आल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची संधी हुकली. आयोगाकडून वारंवार होत असलेल्या अशा तांत्रिक चुकांमुळे उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आयोगाच्या सचिवांशी संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

Story img Loader