लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : सातत्याने अपघातांमुळे चर्चेत असलेल्या समृद्धी महामार्गावर दिवाळीत सर्वाधिक वाहनांनी प्रवास केल्याची माहिती पुढे येत आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या काळात पहिल्या २१ दिवसांमध्ये या महामार्गावर तब्बल १.१६ लाख जास्त वाहने धावली.

दिवाळीच्या काळात एकीकडे रेल्वेचे आरक्षण मिळण्यास अडचण येत असतानाच दुसरीकडे विमानाचेही तिकीट खूप महागले होते. त्यातच खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही प्रवाशांच्या अडचणींचा लाभ घेण्यासाठी अव्वाच्या सव्वा प्रवास शुल्क घेऊन प्रवाशांची लूट केली. हा सगळा प्रकार बघता नागरिकांनी रस्ता मार्गे समृद्धीवरून घर वा नातेवाईकांचे घर गाठणे पसंत केल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) आकडेवारीनुसार १ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर २०२३ दरम्यानच्या काळात समृद्धी महामार्गावरून २ लाख ६६ हजार वाहनांनी प्रवास केला.

आणखी वाचा-नागपूर : ९७ वर्षीय वडिलांसह पाच मुलांनी घेतले मेडिकलमधून शिक्षण

अपघात झाले कमी!

दिवाळीचा सणादरम्यान १ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर २०२३ दरम्यानच्या याच काळात या महामार्गावरून तब्बल ३ लाख ८२ हजार ४१६ वाहने धावली. त्यातही सर्वाधिक ३० हजार ५४३ वाहने ही केवळ १८ नोव्हेंबरला धावली. तर या काळात धावणाऱ्या वाहनांच्या तुलनेत येथे अपघातही कमी झाल्याचे सुखद चित्र असल्याचे एमएसआरटीसीच्या सूत्रांनी सांगितले. या विषयावर एमएसआरटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record number of vehicles traveled on smrudhi highway during diwali mnb 82 mrj