नागपूर : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-३ संवर्गातील २१९ विविध पद/जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ४ मार्च २०२५ पासून राज्यातील ५६ केंद्रावर ऑनलाइन परीक्षा सुरळीत सुरु झालेल्या आहेत. १९ मार्च २०२५ पर्यत या ऑनलाइन परीक्षा होणार आहेत. दरम्यान ऑनलाइन परीक्षेसाठी काही परीक्षा केंद्रावर उमेदवार वेळेवर पोहचत नसल्याचे दिसून आले आहे. तसेच उशिराने आलेले अर्जदारांनी परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळावा म्हणून शासन प्रातिनिधी यांच्याशी हुज्जत घातली आहे. त्यामुळे परीक्षा कामकाजात व्यत्यय येऊ नये म्हणून परीक्षार्थीं उमेदवारांनी निधारीत वेळेतच परीक्षा केंद्रावर उपस्थिती राहण्याची खबरदारी घ्यावी,असे आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर आक्षेप घेतलेला आहे. या भरती प्रक्रियेत अनेक गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप ही त्यांनी केला.

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या ट्विटर अकाउंट वर दिलेल्या माहितीनुसार, समाजकल्याण आयुक्तालय वर्ग ३ या पदांची भरती सध्या सुरू आहे. यात गैरप्रकार होत आहेत हे आम्हाला आमच्या सूत्रांकडून समजले आहे. लातूर, धुळे आणि नंदुरबार येथील सेंटर मॅनेज असून इथे सर्रास गैरप्रकार सुरू आहेत असे समजले आहे. तलाठी भरती मध्ये पण लातूर येथील सेंटर मॅनेज होते. एका सेंटर वरून २०० तलाठीची गैरप्रकार करून निवड झाली आहे. यात आम्ही गुन्हा पण नोंद केला पण पोलीस तपास करत नाहित. यावरून सिद्ध होते की यात खूप मोठे- मोठे मासे आहेत. आता पण हेच सुरू आहे. डमी उमेदवार बसवणे, तोच डमी उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला पाठवणार असे समजले आहे. आणि जॉईन होताना दुसरा जॉईन होणार. एवढी मजल या पेपर फोडणाऱ्यांची झाली असा आरोप करण्यात आला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये

समाज कल्याण विभागाने सांगितले की, दिव्यांग उमेदवारांच्या लेखनिक संदर्भात सविस्तर सुचना जाहिराती मध्येच स्पष्टपणे नमूद करण्यात आलेल्या आहेत. दिव्यांग उमेदावारांने अर्जात नमूद केल्यानुसार स्वत:चा लेखनिक स्वत:च उपलब्ध करून घ्यावयचा आहे, कोणत्याही परिस्थतीत समाज कल्याण विभागाकडून लेखनिक उपलब्ध करून दिला जाणार नसल्याचे विभागाने कळविले आहे. सदर कॉम्प्युटरबेस ऑनलाइन परीक्षा ही ४ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५ रोजी ३ सत्रांमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. राज्यातील ५६ केंद्रावर दररोज साधारणपणे २२ हजार उमेदवार परीक्षेस सामोरे जात आहेत. त्यामध्ये वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक ५ जागांसाठी ११२१६ अर्ज , गृहपाल/अधीक्षक-६१ जागांसाठी ४०९६८ , गृहपाल/अधीक्षक (महिला )-९२ जागांसाठी ७३६२५, समाज कल्याण निरीक्षक-३९ जागांसाठी ५८००९, उच्च श्रेणी लघुलेखक-१० जागांसाठी १३१७ , निम्म श्रेणी लघुलेखक-३ जागेसाठी ६२० व लघु टंकलेखक-९ जागांसाठी १४४७ असे एकूण २१९ जागांसाठी १८७२०२ उमेदवारांचे अर्ज समाज कल्याण विभागास प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ९९५०८ महिला अर्जदार असून ८७६५८ पुरुष अर्जदार आहेत.

३४४८ माजी सैनिक आहेत. फक्त पेन, पेन्सिल, प्रवेशप्रमाणपत्र, ओळखीचा मूळ पुरावा व ओळखीच्या पुराव्याची सुस्पष्ट छायांकित प्रत्त अथवा प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचनेनुसार परवानगी दिलेल्या साहित्यासह उमेदवाराला परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडण्यात येत असून उमेदवारांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच कोणत्याही व्यक्तीने सदर भरती प्रक्रिये बाबत गैरमार्गाने नोकरी देण्याचे/परीक्षा पास करून देण्याचे किंवा तत्सम स्वरूपाचे आमिष दाखविल्यास अशा भूलथापांना बळी न पडता त्याबाबत नजीकच्या पोलीस स्टेशनकडे तात्काळ संपर्क करावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

Story img Loader