नागपूर : औषध निरीक्षक पदाची भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जाहिरातही काढण्यात आली. त्यामुळे औषध निर्माणशास्त्राचे शिक्षण घेतलेल्या अनेक उमेदवारांनी खासगी नोकरी सोडून ‘एमपीएससी’ परीक्षेची तयारी केली. मात्र, अनुभवाच्या सेवाअटींमुळे वादात सापडलेली ही भरती दोन वर्षांआधी स्थगित करण्यात आली. सध्या लाखो उमेदवार या पदभरतीची प्रतीक्षा करत असून दीड वर्षांपासून नव्याने जाहिरातच आलेली नाही.
‘एमपीएससी’च्या पूर्वपरीक्षेची जाहिरात आली. त्यात औषध निरीक्षक पदाचा समावेश असेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यात या पदांचा समावेश नाही. नोव्हेंबर २०२१ नंतर अन्न व औषध प्रशासन विभागातील ८७ औषध निरीक्षकांच्या पदांची जाहिरात निघाली होती. औषध निर्माणशास्त्राची पदवी घेणारे उमेदवार यासाठी अर्ज करू शकत होते. या पदभरतीमध्ये अनुभवाची जाचक अट टाकल्याने याला प्रचंड विरोध झाला. ही अट रद्द करावी म्हणून उमेदवारांनी आंदोलन केले. त्यामुळे ‘एमपीएससी’ने पदभरतीला स्थगिती दिली. अखेरीस अनुभवाची अट रद्द करत नवीन सेवा अधिनियम जाहीर करण्यात आले. त्याच्या अंमलबजावणीची प्रक्रिया लांबल्यामुळे भरती रखडली आहे.
औषध निर्माणशास्त्राची पदवी घेणारे विद्यार्थी अनेकदा खासगी संस्थेत नोकरी करतात. मात्र, ‘एमपीएससी’कडून ही भरती होणार असल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आपली नोकरी सोडून परीक्षेची तयारी सुरू केली. परंतु, वादात सापडलेली पदभरती पुन्हा घेण्यासाठी आयोगाकडून विलंब होत आहे. यासंदर्भात विचारणा करण्यासाठी ‘एमपीएससी’च्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.