नागपूर: महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात बेरोजगारी वाढत आहे. त्यामुळे एखाद्या सरकारी खात्यात शिपाई पदासाठीही जागा निघाल्यास पदव्यूत्तर अभ्यासक्रम केलेले विद्यार्थीही या पदासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज करतांना दिसतात. हाच प्रकार राज्यातील शिखर बँक असलेल्या दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लिमीटेडमध्येही बघायला मिळत आहे. सदर बँकेत लिपीक पदासाठी ४० जागांसाठीची भरती प्रक्रिया झाली. त्यावर ४० अभियांत्रिकी अभ्यासक्रम केलेल्या अभियंत्यांची निवड झाली. त्याला बँकेच्या अधिकाऱ्यांनाही दुजोरा दिला.
नागपुरातील हाॅटेल सेंटर पाॅईंट येथे शुक्रवारी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेची संस्थात्मक प्रशासक म्हणून नेमणूक झाली आहे. त्याबाबतच्या माहितीसाठी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. दि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह बँक लिमीटेडमध्ये शिपाई निवृत्तीला आला असल्यास त्याचेही वेतन ९० हजाराच्या जवळपास असते. त्यामुळे येथे कर्मचाऱ्यांचे वेतन चांगले असल्याचे स्पष्ट होते. दरम्यान बँकेत नुकतीच लिपीक संवर्गातील ४० पदांची पदभरती झाली. ही प्रक्रिया संपूर्ण पारदर्शीपने संपन्न झाली.

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

दरम्यान लिपीक पदासाठी ४० अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेणाऱ्यांची नियुक्ती झाली. शेवटी बँकेने या सगळ्यांना असोसिएट्स असे पदनाम देऊन त्यांना १० टक्के अतिरिकेत वेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याचीही माहिती विद्याधर अनास्कर यांनी दिली. त्यामुळे लिपीक पदासाठी राज्यात अभियांत्रिकीचे उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांकडूनही अर्ज केले जात असल्याचे पुन्हा एकदा पुढे आले आहे. दरम्यान बँकेतील कर्मचाऱ्यांना नियमित १२ ते १६ टक्के वेतनवाढही दिली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

राज्य शासनाकडून दोन लाखावर तरुणांना रोजगाराचा दावा

राज्य शासनाकडून महाराष्ट्रात येत्या काही वर्षात  २ लाखाहून जास्त तरुणांना रोजगार मिळणार असल्याचा दावा झाला होता. त्याबाबत डिसेंबर २०२४ मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले होते. राज्यात १ जुैले २०२२ पासून २२१ विशाल आणि अतिविशाल प्रकल्प सुरु आहेत.  यात ३ लाख ४८ हजार कोटी रुपयांची गुंतववणूक त्यात केली गेली. यासह ३०३ प्रककल्पांचा विकास करण्यात येतोय. त्यापैकी ९५ प्रकल्प सुरु झालेत.  विदर्भ तसेच मराठवाड्यात अनेक बडे उद्योजक गुंकवणूक करणार आहेत. २०२२ ते २०२४ या वर्षात महाराष्ट्रात २ लाख ४४ हजार कोटींची परकीय गुंतवणूक झालेली आहे. आपल्या राज्यातील उद्योग दुसऱ्या राज्यात गेल्याचा आरोप विरोधर करतात. त्यांनी ही आकडेवारी पहावी असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी लगावला होता.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recruitment of engineers for 40 clerk posts in maharashtra state co operative bank mnb 82 amy