वर्धा : जिल्हा प्रशासनाने वर्धा तालुक्यातील अठरा सांझात व आर्वी तालुक्यातील पंधरा महसुली सांझ्यात कोतवाल भरती करण्याचा निर्णय घेतला. तेवीस मे रोजी परीक्षा व पंचवीस मे ला निवड होणार आहे. या भरतीत आदिवासी वगळता उर्वरित सर्व आरक्षित घटकांना आरक्षण मिळाले. मात्र एसटी म्हणजेच आदिवासी समाजास आरक्षित जागा मिळाल्या नाहीत.
आर्वी तालुक्यात भरती होणाऱ्या बोथली, सोर्ता, दौतपूर, नेरी व अन्य गावात लक्षणीय संख्येत आदिवासी आहेत. पण त्यांना दूर ठेवण्यात आल्याची भावना या भागात काम करणारे आदिवासी नेते अवचितराव सयाम हे व्यक्त करतात. प्रशासनाकडून या बाबत समाधानकारक खुलासा मिळाला नसल्याचे ते सांगतात. न्याय मिळावा म्हणून त्यांनी संघटनेतर्फे राष्ट्रीय जनजाती आयोग दिल्ली यांच्याकडे तक्रार नोंदविली आहे.
हेही वाचा – वर्धा : अवकाळी पावसामुळे भाजीपाला स्वस्त, शेतकरी मात्र त्रस्त
अनुसूचित जमातीचे लोक या सांझ्यात मोठ्या प्रमाणात असूनही लोकसंख्येचा निकष त्यांना का लावण्यात आला नाही, असे निदर्शनास आणण्यात येते.आरक्षण देत ही भरती प्रक्रिया नव्याने राबविण्याची मागणी होते.