महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर: राज्यात शनिवारी (२ सप्टेंबर) सकाळी महावितरणची विजेची शिखर मागणी शुक्रवारच्या तुलनेत कमी झाली. त्यानंतरही सुमारे १,२०० मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यभरातील ‘जी’ गटातील फिडरवर तब्बल दीड तासांचे आपत्कालीन भारनियमन केले गेले.
राज्यात शुक्रवारी (१ सप्टेंबर) सकाळी ६ वाजताच्या दरम्यान महावितरणची विजेची शिखर मागणी २४ हजार ३०० मेगावॉट होती. त्यामुळे उपलब्ध विजेच्या तुलनेत मागणीत ९०० मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाल्याने सकाळी ६ ते ७.३० वाजेदरम्यान जी १ ते जी ३ गटातील फिडरवर आपत्कालीन भारनियमन केले गेले. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी (२ सप्टेंबर) महावितरणची शिखर मागणी सकाळी ५.४० वाजेदरम्यान दरम्यान २३ हजार ७०० मेगावॉटवर खाली आली. त्यामुळे उपलब्ध विजेच्या तुलनेत मागणीत १ हजार २०० मेगावॉटचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्यात सकाळी ५.४० ते ७.१५ दरम्यान जी गटातील फिडरवर भारनियमन करावे लागले.
आणखी वाचा-चंद्रपुरात उन्हाचा तडाखा! पावसाअभावी कापूस, सोयाबीन, धान करपण्याच्या मार्गावर
सकाळीच बत्ती गुल झाल्याने अनेक भागात वीज ग्राहकांनी महावितरणवर संताप व्यक्त केला. तर महावितरणकडून ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून विजेची जुळवा- जुळव सुरू असून त्यानंतर अथवा अनुमानानुसार राज्यात पाऊस पडल्यास मागणी कमी होऊन भारनियमन बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे.