आरोग्य विभागाच्या शोध मोहिमेवर प्रश्न; वर्षभरात केवळ ७८४ रुग्ण आढळले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर जिल्ह्य़ात सन २०१५ मध्ये ९३९ नवीन कुष्ठरुग्ण आढळले होते. परंतु सन २०१६ मध्ये त्यात आश्चर्यकारक घट झाल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्य़ात १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ दरम्यान ७८४ नवीन कुष्ठरुग्ण आरोग्य विभागाला आढळून आले. या वर्षी आरोग्य विभागाकडे कर्मचाऱ्यांच्या तुटवडासह महापालिकेकडून कुष्ठरोग शोधण्याकरिता सहकार्य न मिळाल्याने ही संख्या घटल्याची किमया घडल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगत आहेत. यंदा आढळलेल्या कुष्ठरुग्णांत ७० लहान मुलांचा समावेश आहे, हे विशेष.

केंद्र व राज्य शासनाकडून कुष्ठरोग नियंत्रणाकरिता अनेक घोषणा केल्या जातात. विविध योजनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते. याकरिता दोन्ही सरकारकडून कोटय़वधींचा खर्च केला जातो. परंतु अद्यापही कुष्ठरोगावर हवे त्या प्रमाणात महाराष्ट्रासह देशाच्या काही राज्यांत नियंत्रण झाल्याचे दिसत नाही. नागपूर जिल्ह्य़ात ३१ मार्च २०१५ रोजीच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार कुष्ठरोगाचे ४६१ जूने रुग्ण शिल्लक होते. त्यांच्यावर उपचार सुरू होता. त्यात १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या एक वर्षांतील ७८४ रुग्णांची भर पडली आहे. या रुग्णांमध्ये ७० लहान मुलांचा समावेश आहे.

सोबत सार्वजनिक आरोग्य विभागाने स्वतसह जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने नागपूर जिल्ह्य़ातील शहर व ग्रामीण असा दोन्ही भागात विविध भागात झोपडपट्टी, चाळ, दुर्गम भाग, वीटभट्टी, मजूर वस्तीसह अनेक भागात सर्वेक्षण केले. पैकी अनेक भागात नवीन कुष्ठरुग्ण आढळल्याची माहिती आहे.

गेल्या वर्षभरात आरोग्य विभागाला आढललेल्या एकूण कुष्ठरुग्णांत ३६२ रुग्ण असांसर्गिक गटातील आणि ४२२ रुग्ण हे सांसर्गिक गटातील आढळल्याची माहिती आहे.

सांसर्गिक गटातील रुग्णांकडून इतरांनाही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते, हे विशेष.

कुष्ठरोगाबाबत गैरसमज

कुष्ठरोग अनुवांशिक नसून या आजाराबद्दल आजही समाजात चुकीचा समज आहे. ग्रामीण, आदिवासी पाडय़ासह अनेक भागात आजही कुष्ठरुग्ण आढळल्यास त्यावर उपचाराकरिता पूजा-अर्चा, नवस फेडणे, जडीबुटी, मंत्र- तंत्र असे उपाय केले जातात. हा चुकीचा प्रकार असून योग्य उपचाराने हा आजार बरा होऊ शकतो. त्यातच उपचार न घेतलेल्या सांसर्गिक कुष्ठरोगाच्या जंतूचा प्रसार हवेतून होऊ शकतो. त्यावर नियंत्रणाकरिता काळजी घेण्याची गरज आहे.

‘कुष्ठरोगावर नियंत्रण शक्य’

कुष्ठरोग या आजाराचा काळ हा तीस वर्षांपर्यंत असतो. या कालावधीत रुग्णाला पुन्हा हा आजार होण्याची शक्यता असते. त्यातच आरोग्य विभागाकडून जिल्ह्य़ात राबवल्या जाणाऱ्या शोध मोहिमेत रुग्ण शोधण्याला यश येत असल्याने रुग्ण संख्या वाढल्याचे दिसत आहे. या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात मोफत उपचार केले जातात. विविध सामाजिक संघटनेने पुढे येऊन आरोग्य विभागाला कुष्ठरुग्ण शोधण्याकरिता मदत केल्यास आजारावर नियंत्रण शक्य आहे, असे मत आरोग्य सेवा (कुष्ठरोग) नागपूर विभागाच्या सहाय्यक संचालक डॉ. माध्यमा चहांदे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

कुष्ठरोगाची लक्षणे

  • अंगावरील त्वचेच्या रंगापेक्षा फिक्कट, लालसर कुठलाही डाग.
  •  त्वचेला कोरडेपणा येतो व भेगा पडतात.
  • संबंधित भागात बधिरता येते.