लोकसत्ता टीम
अमरावती : रील बनविण्यासाठी कोणते प्रयोग केले जातील, याची शाश्वती राहिलेली नाही. टर उडविणे, स्टंट करणे असे उद्योग हे समाज माध्यमवीर करत असतात. अमरावतीत एका रीलस्टारने चक्क भरचौकात सिग्नलवर महिलेसाबत नृत्य करीत रील काढल्याचा प्रकार समोर आला आहे. समाज माध्यमावर ही चित्रफित प्रसारीत होताच, त्यावर प्रतिक्रियाचा पाऊस पडला आहे.
समाज माध्यमांवर लाईक मिळवण्यासाठी अनेक जण रील तयार करीत असतात. लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न ते करतात, पण त्याच्या नादात सामान्य नियमांचे उल्लंघन तर होत नाही ना, याचे भान त्यांना राहत नाही. अमरावतीत अशाच प्रकारची एक चित्रफित प्रसारीत झाली आहे.
अमरावतीच्या पंचवटी चौकातील उड्डाणपुलाखालील सिग्नलवर हे छायाचित्रण करण्यात आले आहे. अमरावती येथील व्हीडिओ क्रिएटर देविदास इंगोले यांनी ही रील तयार केली आहे. त्यात देविदास इंगोले हे ‘कैसे कटे दिन, कैसे..’ या हिंदी गीतावर हातात डफली घेऊन फेर धरताना दिसत असून एक महिला नृत्यांगणा नृत्य करताना दिसत आहे.
देविदास इंगोले यांनी सोमवारी ही चित्रफित प्रसारीत केल्यानंतर त्याला दिवसभरात ५० हजारांहून अधिक लोकांची पसंती मिळाली आहे. पण, त्यावर उलट-सुलट प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत. या रीलमध्ये देविदास इंगोले हे गाण्यावर फेर धरीत असताना त्यांच्यात बाजूने अनेक जण वाहने घेऊन जाताना दिसत आहेत, तर काही लोक हे ग्रीन सिग्नलच्या प्रतीक्षेत चौकात उभे आहेत. त्यांच्या नृत्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत असताना वाहतूक पोलीस काय करीत होते, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
अमरावती शहरातील अनेकांनी रीलस्टार म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यापैकी देविदास इंगोले हे एक आहेत. यापूर्वी अमरावतीच्या जयस्तंभ चौक ते श्याम चौक मार्गावर भर पावसात एका रिल स्टारचे नृत्य हजारो लोकांनी पसंत केले होते. पण, ते रस्त्याच्या कडेला केल्याने त्यावर तिखट प्रतिक्रिया उमटल्या नव्हत्या. पण, पंचवटी या वर्दळीच्या परिसरात अशा प्रकारे वाहतुकीला अडथळा निर्माण करून रील तयार करणे योग्य आहे का, असा सवाल अनेक अमरावतीकरांनी केला आहे.
पंचवटी परिसरातील ही चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारीत झाली आहे. हे चित्रिकरण केंव्हा करण्यात आले, याची माहिती मिळालेली नाही, पण समाज माध्यमांवर ते कालपासून गाजत आहे.