नागपूर : छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची एक वादग्रस्त ध्वनिफीत समोर आली असून यात त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव, मंत्री सारेच भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला आहे. याशिवाय आश्रम शाळांमधील मुलींवर अत्याचार सुरू असल्याचाही आरोप केला आहे. त्यांच्या या ध्वनिफीतने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सध्या राज्यात समाजकल्याण मंत्री खुद्द मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे सोनकवडे यांचा थेट मुख्यमंत्र्याकडे इशारा तर नाही ना अशाही चर्चा सुरू आहेत. या ध्वनिफितीमध्ये जयश्री सोनकवडे कुणाशीतरी संवाद साधत आहेत. यात त्यांनी शासन आणि प्रशासनावर टोकाचे आरोप केले आहेत. शासन काहीच करत नसून याविरोधात आंदोलन उभं करा असा सल्ला त्या देत आहेत. राज्यात काय चालले आहे, मंत्री बदलीसाठी पैसे मागतात, अधिकारी महिलेला निलंबित करण्यासाठी उपोषण करायला लावतात, आपल्याच महिला सहकार्यावर चारित्र्यहननाचे आरोप तसेच समाजकल्याण विभागामध्ये टोकाचा भ्रष्टाचार सुरू आहे, असाही उल्लेख त्या ध्वनिफितीमध्ये आहे.
हेही वाचा – राज्यातील काही शहरे अजूनही उन्हाच्या तडाख्यात, मान्सून पूर्णपणे सक्रिय नाही
आश्रमशाळेमध्ये दहा मुलींवर अत्याचाराचा यामध्ये उल्लेख आहे. विशेष म्हणजे पोलीस, न्यायालय भ्रष्ट, सचिव, मंत्री भ्रष्टाचारी असल्याचा उल्लेख यात सोनकवडे करताना दिसून येत आहेत. त्यामुळे त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसल्याचे दिसून येत आहे.