लोकसत्ता टीम
नागपूर: मध्य भारतातील पहिले प्रादेशिक नेत्र इन्स्टिट्यूट नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) करण्यासाठी मी स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे पाठपुरावा करेल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
मेडिकल रुग्णालयातील नेत्र विभागाकडून शनिवारी आयोजित नेत्रदान पंधरवड्याच्या जनजागृतीपर रॅलीच्या शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. मिनल व्यवहारे, डॉ. अशोक मदान उपस्थित होते. मुनगंटीवार पुढे म्हणाले, नेत्रदान हे ईश्वरीय व समाजाच्या हिताचे काम आहे.
आणखी वाचा-माझ्या घरात मी सोडून सगळेच डॉक्टर, मेडिकलचे निमंत्रण पत्नीनेच दिल्याने…
मेडिकलमध्ये डोळ्याशी संबंधित रुग्ण मोठ्या संख्येने येतात. या रुग्णांना सगळ्या अद्ययावत सुविधा मिळालयला हव्या. त्यासाठी जे साहित्य लागत असेल ते शासनाकडून अथवा जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध केले जाईल. येथूनही निधीची सोय न झाल्यास माझ्याकडील फॉरेस्ट कार्पोरेशन डेव्हलपमेंटमधून सामाजिक दायित्व निधी मिळवून दिले जाईल. अंधत्वाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. त्यामुळे नेत्रदानाला चळवळीचे स्वरूप द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.