नागपूर : नैऋत्य मोसमी पाऊस परतल्यानंतर आता तापमानाचा पारा वेगाने घसरला आहे. त्यामुळे उपराजधानीला यावेळी कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासांत किमान तापमानात ०.४ अंश सेल्सिअसने घट झाली. प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या दोन आठवड्यात तापमानात फारसा बदल होणार नाही. उत्तरेकडील वारे अलीकडे प्रबळ होत आहेत. परिणामी, विदर्भात थंड वारे वाहत आहेत, असे अधिकाऱ्याने सांगितले. तापमान सुमारे २० अंशापर्यंत खाली घसरले. नैऋत्य मोसमी पाऊस परतण्यास उशीर झाल्यामुळे यावेळी कडाक्याच्या थंडीचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
शहरात गेल्या चार महिन्यात सरासरीपेक्षा खूप जास्त पाऊस झाला. एक ते २२ ऑक्टोबरदरम्यान शहरात १३८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या नऊ वर्षातील ऑक्टोबर महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस होता. नागपूर आणि विदर्भातील तापमानातील घसरण सामान्यपणे उत्तर राज्यात आणि एकाचवेळी उत्तर-पश्चिम/उत्तरेकडील वाऱ्यामुळे होते, असे हवामान अभ्यासकांचे म्हणणे आहे.
सामान्यत: डिसेंबर महिन्यात तापमानात वेगाने घसरण होते, पण यावेळी ऑक्टोबरच्या उत्तरार्धातच ही घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे हुडहुडी भरवणारी थंडी जी डिसेंबर महिन्यात अनुभवायला येत होती, ती यावेळी आतापासूनच अनुभवायला मिळत आहे. उपराजधानी एरवी देखील कडाक्याच्या थंडीसाठी ओळखली जाते. दरम्यानच्या काळात ३.७ अंश सेल्सिअस तापमानाचा पारा या शहराने अनुभवला आहे. त्यामुळे यावेळी थंडीचा हा विक्रम मोडला जाईल का, यावर चर्चा सुरू झाली आहे.