लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : स्व. बाळासाहेब ठाकरे समृद्धी द्रुतगती महामार्ग आता मृत्यूचा म्हणजेच अपघाताचा मार्ग ठरत आहे. समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. वाशीम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर तीन दिवसात चार अपघात झाले. या अपघातांमध्ये चार जणांचा बळी गेला, तर अनेक जण जखमी झाले. महाकुंभमेळासाठी जाणारे भाविक देखील अपघातग्रस्त होत असल्याचे समोर आले. समृद्धीवर सातत्यपूर्ण घडणाऱ्या अपघातांमुळे महामार्गाच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे.

मुंबई ते नागपूर असा ७०१ किलोमीटरचा प्रवास अवघ्या आठ तासांत पार करण्याचे उद्दिष्टे ठेऊन समृद्धी महामार्ग तयार झाला. दहा जिल्ह्यांमधील ३९० गावांना हा महामार्ग जोडतो. अत्याधुनिक पद्धतीने समृद्धी द्रुतगती महामार्ग तयार केल्या गेला. नियमित घडणाऱ्या अपघातांमुळे मात्र या महामार्गाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले. वाशीम जिल्ह्यात तीन दिवसांमध्ये चार अपघात घडले आहेत. समृद्धी महामार्गावर कारंजा तालुक्यातील चॅनल १८४ जवळ ट्रकच्या अपघातात चालक आणि क्लीनरचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी घडला.

गजानन छोटू हिरवाणी (वय ४६, रा. सीतासावंगी, गोबरवाही, भंडारा) व आम्हीपाल महेश कुमार (४०, रा. नागपूर), अशी मृतांची नावे आहेत. नागपूरहून संभाजीनगरकडे जात असताना ट्रकने पुढील ट्रकला मागून जोरदार धडक दिली होती. पुण्यावरून नागपूरकडे जात असलेल्या खासगी बसवरचे (क्र.एम.एच.१२ एच.जी. ६६६७) चालकाचे नियंत्रण गेल्याने समृद्धी महामार्गावर चॅनेल क्र. २१५ वर अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार, तर सुमारे २० जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली होती.

दरम्यान, कुंभमेळासाठी प्रयागराज येथे जाण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत आहेत. १८ फेब्रुवारीला कारंजा तालुका हद्दीत समृद्धी महामार्गावर दोन वेगवेगळ्या अपघातांत तीन जण जखमी झाले आहेत. पहिला अपघात नागपूरकडे जाणाऱ्या महामार्गावर चॅनल १६४ वर घडला. छत्रपती संभाजीनगरहून प्रयागराजला जात असलेल्या (क्र. एम.एच. ०२ डी.आय. ५८७८) चारचकीचे अॅक्सेल तुटल्याने ती दुभाजकाला धडकली. यात एक जण जखमी झाला. दुसरा अपघात मुंबईकडे जाणाऱ्या चॅनल १७३ वर घडला. चारचाकीने (क्र. २२ बी. एच. ३३५७ ए) प्रयागराजहून पुण्याला परतांना अचानक नीलगाय समोर आल्याने अपघात झाला. यात संकल्प कल्याणकर (३२) आणि मयुरी कल्याणकर (३०) हे दोघे जखमी झाले. जखमींवर उपचार करण्यात आले. वेगवेगळ्या कारणामुळे समृद्धी महामार्गावर घडणारे अपघात रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.