नागपूर : सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात वाघ नाही, पण येथे वाघाचे अस्तित्व राहीले आहे. ते कायमस्वरुपी असावे यासाठी आता राज्याच्या वनखात्याने पावले उचलली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने त्यावर शिक्कामोर्तब केले असून लवकरच या व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांना व्याघ्रदर्शन होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील आठ वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात सोडण्याची परवानगी वनखात्याने मागितल्यानंतर नुकतेच प्राधिकरणाने ही परवानगी दिली आहे. या प्रकल्पासाठी प्राधिकरणाकडून १०.५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या ठिकाणी वाघ स्थलांतरित करण्यात येणार असून काही हरिणांना येथे सोडण्यात आले आहे.
राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महीप गुप्ता हे या प्रकल्पाचे अध्यक्ष तर प्रकल्प समन्वयक म्हणून अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पश्चिम) वन्यजीव विभाग डॉ. व्ही. क्लेमेंट बेन असणार आहेत. या प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक व डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ के. रमेश, सहअन्वेषक शास्त्रज्ञ डॉ. नावेंदू पागे, डॉ. प्रशांत महाजन असतील. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघ नसला तरीही तिथल्या व्यवस्थापनावर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतलेली मेहनत दिसून आली आहे. प्रस्ताव तयार झाल्यानंतरच याठिकाणी वाघ स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यासाठी येथे आधी चितळ सोडण्यात आले. त्यामुळे आता येथे चितळांची संख्याही वाढली आहे.