वर्धा : काँग्रेसच्या राजवटीत रोज एक घोटाळा निघत गेला. तो जिजाजी घोटाळ्यापर्यंत पोहचला. म्हणून लोकांनी नरेंद्र मोदी यांना सत्ता सोपविली. गत नऊ वर्षात अफाट विकास झाला, असे वक्तव्य केंद्रीय क्रीडा मंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी केले. महाजनसंपर्क अभियानाच्या सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, की काँग्रेसने जातीचे तर मोदींनी विकासाचे राजकारण केले. या नऊ वर्षात देशाचा जगभर सन्मान वाढला. राम मंदिर बांधणारे व ३७० कलम हटविणारे नेतृत्व या देशाला मिळाले आहे. काँग्रेसचे तुष्टीकरण तर मोदींचे संतुष्टिकरणाचे राजकारण आहे. गरिबी कमी होत आहे. आगामी तीन वर्षात जगातील तिसऱ्या क्रमांकाची भारताची अर्थव्यवस्था होणार. पुढील काळात देशात १५ऑगस्ट पर्यंत खेलो इंडिया अंतर्गत एक हजार खेलो केंद्र तयार होणार असून एक केंद्र वर्धा जिल्ह्यात राहील.केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन करण्यासाठी कामाला लागा,असे आवाहन ठाकूर यांनी केले.
हेही वाचा >>> आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय शिंदे गटात सामील होणार?
खा.तडस यांनी हिंगणघाट येथे स्टेडियम देण्याची मागणी केली.तर लोकसभा क्षेत्र प्रभारी सुमित वानखेडे यांनी आगामी निवडणुकीत काँग्रेसचे बूथही लागू न देण्याचे आवाहन केले. उपस्थित वक्त्यांनी खासदार तडस यांच्या कार्याची भरभरून प्रशंसा करीत त्यांना दीडपट अधिक मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. उपेंद्र कोठेकर, सुनील गफाट , प्रताप अडसड,राजेश बकाने, दादाराव केचे,भूपेंद्र शहाणे प्रामुख्याने उपस्थित होते.अविनाश देव व संजय गाते यांनी सभेचे सूत्र सांभाळले.