देवेश गोंडाणे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : तलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. परीक्षा घेणाऱ्या टीसीएस कंपनीतील एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि बहिणीचा पती गुणवत्ता यादीमध्ये पहिला आल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने  केला आहे.

तलाठी भरती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. त्यात अनेक उमेदवारांना एकूण २०० गुणांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ‘नॉर्मलायझेशन’नंतर गुणवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु, तलाठी भरती प्रक्रियेत पेपर फुटीच्या घटना घडल्याचे उघड झाले होते. त्यात आता स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने स्पर्धा परीक्षेशी कोणताही संबंध नसलेला एक टॅक्सीचालक आणि एक गृहिणी यांना अनुक्रमे २०८ आणि १९८ गुण कसे मिळाले, असा प्रश्न स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने उपस्थित केला आहे. ठाणे जिल्ह्याच्या यादीमध्ये हे दोन्ही उमेदवार पहिले आले असून ते टीसीएसमधील कर्मचाऱ्याचे नातेवाईक असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने ‘एक्स’वरील संदेशाद्वारे केला आहे.तलाठी भरती परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला १९८ आणि बहिणीच्या पतीला २०८ गुण मिळाल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.

हेही वाचा >>>विश्लेषण : तलाठी परीक्षेतील ‘सामान्यीकरणा’चा वाद काय आहे? एकूण गुणांपेक्षा जास्तीचे गुण मिळतातच कसे?

‘टीसीएस’चा प्रतिक्रियेस नकार

या प्रकाराबद्दल प्रतिक्रियेसाठी टीसीएस कंपनीचे विभागीय विपणन प्रमुख दीपांकर बॅनर्जी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘‘प्रसार माध्यमांना उत्तर देण्यास मी बांधील नाही, आम्ही फक्त परीक्षा घेणाऱ्या शासकीय विभागांना उत्तर देऊ शकतो,’’ असे  सांगून अधिक बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, शासन निर्णयात बॅनर्जी यांचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. याप्रकरणी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

टीसीएस कंपनीच्या कर्मचाऱ्याची पत्नी आणि बहिणीचा पती ठाणे जिल्ह्यामध्ये गुणवत्ता यादीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या कर्मचाऱ्याच्या मदतीनेच हा प्रकार घडला आहे. गृहमंत्र्यांना पुरावेच हवे असतील तर ते आम्ही देतो. त्यांनी निष्पक्ष चौकशी करावी. – राहुल कवठेकर, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relative merit list of employee of tcs company nagpur amy