वर्धा : बुलढाणा अपघाती अग्नी प्रलयात चौदा दगावले. त्यांचे स्वकीय हुंदके दाबत अपघातस्थळी पोहोचले आणि पोहोचताच हंबरडा फुटला. वर्धेच्या प्रशासकीय चमूने त्यांना धीर दिला. पण तो जुजबीच ठरावा.
एकेकास शवागारात ओळख पटविण्यासाठी नेण्यात आले. पण कसचे काय, एकही आपला जिवलग ओळखण्यास असमर्थ ठरला. घरून निघाला होता त्यावेळी झाले तेच अंत्यदर्शन ठरले. रडायचे कोणाला पाहून, असाच बाका आणि संवेदना नष्ट करणारा अनुभव. करायचे काय या प्रश्नानं सर्व आप्त दुःख विसरून भावना व्यक्त करते झाले. सर्वांचा एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय मान्य करावा लागला. दुःखाचे हुंकार क्षणभर बाजूला पडले.
निवास हीच बाब होती. कारण भूक वेदनेतच मेली. बुलढाणा प्रशासनाने सर्वांची सोय हॉटेलात केली आहे. तिथे जिवलगाच्या आठवणीतच काळरात्र कशीबशी निघाली. जवळपास शंभर आप्त पोहोचले आहे. एक परीवार आज सकाळी पोहोचणार. त्या सर्वांना आमदार डॉ.पंकज भोयर, प्रशासन अन्य काहींनी गाड्या देत बुलढाणा येथे जाण्याची व्यवस्था करून दिल्याची माहिती तहसीलदार रमेश कोळपे यांनी दिली. घटना कळताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी त्यांना चार सहकारी देत अपघातस्थळी रवाना केले होते. त्याच चमूने तिथे आलेल्या सर्वांची विचारपूस करीत समजूत काढली. कारण तिथे तेच त्यांचे पालक होते. कोळपे म्हणाले की, एखाद तासानंतर स्मशानभूमित पोहोचू. कोणाचे तर पायच निघत नाही. पण या प्रसंगाला तर सामोरे गेलेच पाहिजे म्हणून कसेबसे सगळे तयार होत नाही.
काही तर आले तेव्हापासून मूक आहेत. फार बिकट अनुभवातून जात असल्याचे कोळपे लोकसत्ता ऑनलाईनशी संवाद साधताना काळीज घट्ट करीत बोलले. दरम्यान, आज सकाळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट हे अंत्यसंस्कारास उपस्थित राहण्यासाठी वर्धेतून निघाले आहेत.