मनात येईल तेथे खोदकाम, प्रशासनाचे दुर्लक्ष; महापालिकेच्या विशेष सभेत सदस्यांचा आरोप
नागपूरची ‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल सुरू असताना रिलायन्स कंपनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता शहरातील विविध भागात रस्त्याचे खोदकाम करून केबल टाकण्याचे काम करीत आहे. त्यानंतर रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने शहराचे विद्रुपीकरण होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. यापुढे अशा पद्धतीने काम सुरू राहिल्यास संबंधित झोन अधिकाऱ्यांवर कारवाई आणि कंपनीला दंड करा, तसेच विना परवानागी मोबाईल टॉवर उभारणाऱ्या इमारतींवर आणि संबंधित कंपनीवर कारवाई करा, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी दिले.
महापालिकेच्या आजच्या विशेष सभेत सदस्यांनी प्रश्नोत्तराच्या तासात रिलायन्स कंपनीतर्फे शहरात सुरू असलेल्या खोदकामाचा मुद्दा उपस्थित करून रस्त्यांची दुरुस्ती केली जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी रिलायन्सच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले.
काँग्रेसचे नगरसेवक वासुदेव ढोके यांनी रिलासन्स संदर्भात प्रश्न उपस्थित केला. सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी आणि विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी रिलायन्स कंपनी संदर्भात झोन अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याचे सांगून संबंधित अधिकारी त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. यावेळी विकास ठाकरे म्हणाले, कंपनीतर्फे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून केबल टाकण्याचे काम सुरू असताना त्यांनी खोदकाम केल्यानंतर रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे. झोन अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे, पण ते दुर्लक्ष करीत आहेत. महापालिका प्रशासनाला विश्वासात घेऊन काम न करण्याचे धोरण त्यांनी सुरू केले आहे. कामासंदर्भात महापालिकेची योजना असताना त्याबाहेर जाऊन रिलायन्स काम करीत आहे. हॉट मिक्सला त्याची जबाबदारी देण्यात आली आहे, पण ते काम करीत नाही. स्मार्ट सिटी म्हणून शहराचा विकास केला जात असताना शहरातील अनेक रस्त्यांची आज दुरवस्था झाली आहे.
यावेळी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी म्हणाले, रिलायन्स शहरात केबल टाकण्याचे काम करीत असताना महापालिकेचे नुकसान होत आहे. ज्या भागात केबल टाकण्याचे काम केले जाते, त्या झोनची मंजुरी घेणे आवश्यक आहे. मात्र, त्या संदर्भात मंजुरी घेतली जात नाही. शहरातील विविध भागात त्यांची मनमानी सुरू असताना झोन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. प्रशासनाने या संदर्भात कंपनीच्या विरोधात कडक धोरण अवलंबून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे आणि झोन अधिकारी जर त्याकडे दुर्लक्ष करीत असेल तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी केली.
रिलायन्समुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. केबल नेटवर्क कंपन्या शहरातील विविध भागात केबल टाकत असताना त्या संदर्भात महापालिकेचे धोरण असावे. विना परवानगी काम केले जात असेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली पाहिजे. यापुढे अशा पद्धतीने काम सुरू राहिल्यास संबंधित झोन अधिकाऱ्यांवर कारवाई आणि कंपनीला दंड करा, तसेच विना परवानागी मोबाईल टॉवर उभारणाऱ्या इमारतींवर आणि संबंधित कंपनीवर कारवाई करा, असे निर्देश महापौरांनी दिले.
अहवाल तयार करण्याचे निर्देश
विकास ठाकरे यांनी इंडस कंपनीच्या अनधिकृत मोबाईल टॉवरचा प्रश्न उपस्थित करून प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप केला. शहरातील कोणत्या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारले जावे, असे धोरण निश्चित झालेले असताना त्याबाबत प्रशासनाकडून काहीच कारवाई केली जात नाही. उत्तर नागपूरमध्ये सर्वात जास्त मोबाईल टॉवर असून त्यातील अनेक विनापरवानगी लावण्यात आले आहेत. २००९-१० मध्ये शहरातील विविध इमारतींवर ४२५ टॉवर्स उभारण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे कारवाई व्हावी, त्या संदर्भात अहवाल तयार करावा आणि तो फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या सभेमध्ये ठेवण्यात यावा, असे निर्देश महापौर प्रवीण दटके यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा