” ‘त्या’ दु:खद प्रसंगात अडकल्यानंतर मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी माझ्या हातून पुन्हा समाजाची सेवा घडेल असे वाटले नव्हते. मात्र त्या प्रसंगात आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाठिशी उभे राहिले, समाजाने बळ दिले आणि आज पोहरादेवी येथे पुन्हा तुमच्या सेवेसाठी लाखो लोकांच्या साक्षीने उभा आहो”, अशी कबुली देत मंत्री संजय राठोड यांनी दोन वर्षांपूर्वीच्या पूजा चव्हाण प्रकरणाच्या कटू आठवणींना उजाळा दिला.
हेही वाचा- बुलढाणा: रविकांत तुपकरांना अटक; २५ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल
श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे १३५ फूट उंच सेवाध्वज स्थापना, संत श्री सेवालाल महाराज यांचा पंचधातूचा अश्वारूढ पुतळा अनावरण व ५९३ कोटीच्या विकासकामांचे भूमिपूजन आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झाले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संजय राठोड यांनी ‘त्या’ प्रकरणाच्या कटू आठवणी सांगितल्या. त्यावेळी आपल्या बाबतीत घडलेल्या दु:खद प्रसंगातून बाहेर पडण्याची कोणतीही आशा नसताना केवळ समाजाच्या पाठबळामुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पाठिशी खंबीरपणे उभे राहिल्यानेच आजचा दिवस बघू शकत असल्याची भावना व्यक्त केली.
हेही वाचा- वाशीम : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पोहरादेवीत दाखल; पोलीस बंदोबस्त अपुरा, कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी
पोहरादेवी येथे चार वर्षांपूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नंगारा वास्तू संग्रहालयाच्या भूमिपूजन झाले होते. त्यावेळी शिवसेना आणि भाजपमध्ये युतीवरून शीतयुद्ध सुरू होते. अशा वातावरणात देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एका मंचावर आणण्याचे श्रेय संजय राठोड यांनी घेतले होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी सोबतच नंगारा वाजवून युतीचे संकेत दिले होते. आजच्या कार्यक्रमातही नंगारा वाद्य वाजविण्यात आले. मात्र आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वेगवेगळे नंगारे वाजविले. संयज राठोड यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत नंगारा वाजविला.
पूजा चव्हाण प्रकरण, त्यानंतर द्यावा लागलेला राजीनामा आणि शिंदे गटात गेल्यानंतर पुन्हा मंत्रिमंडळात प्रवेश अशा अनेक घटनांना गेल्या दोन वर्षांत संजय राठोड यांना सामोरे जावे लागले. बंजारा समाज ही संजय राठोड यांची शक्ती आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात समावेश होताच राठोड यांनी पुन्हा एकदा बंजारा समाजावर लक्ष केंद्रित केले आणि सेवाध्वज व संत सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा उभारण्याचे काम हाती घेतले. या अनुषंगाने तब्बल ५९३ कोटी रूपयांचा ‘बिग बजेट’ असा पोहरादेवी विकास आराखडा शासनकडून मंजूर करून घेण्याची किमया साधली. याच विकासकामांच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने संजय राठोड यांनी देशभरातील बंजारा बांधवांना एकत्रित करून पोहरादेवी येथे आज शक्ती प्रदर्शन केले. प्रास्ताविकात संजय राठोड यांनी समाजाच्या वतीने तब्बल २८ मागण्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांपुढे मांडल्या. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणच देशपातळीवर बंजारा समाजाचे नेतृत्व करीत असल्याचे चित्र निर्माण करण्यात संजय राठोड यशस्वी झाल्याची चर्चा पोहरादेवी येथे रंगली होती.