सोलापूर : सोलापुरातील प्रख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय ७०) यांच्या आत्महत्याप्रकरणी त्यांच्याच रुग्णालयातील एका महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. संबंधित महिलेवर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप होता. हा प्रकार अंगलट येऊ नये म्हणून ही महिला कर्मचारी डॉ. वळसंगकर यांना सतत धमकावत होती, असा आरोप आहे. त्यास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याच्या आरोपावरून पोलीस तपास सुरू आहे.
ही महिला एका राजकीय पक्षाच्या स्थानिक नेत्याशी संबंधित आहे. तिच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल झाला आहे. डॉ. वळसंगकर यांचे पुत्र, मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. अश्विन वळसंगकर यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली.
संबंधित महिला डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स रुग्णालयात नोकरीस होती. या रुग्णालयात आर्थिक गैरव्यवहारातून ती अडचणीत आली होती. मात्र यानंतरही डॉ. अश्विन वळसंगकर यांनी तिला वेळोवेळी सहकार्य केले. परंतु तरीही ती, कारवाई केली तर आत्महत्या करण्याची धमकी डॉ. शिरीष वळसंगकर यांना देत होती. डॉ. वळसंगकर तिच्या सततच्या त्रासाला वैतागले होते. त्यातूनच त्यांनी मोदीखान्यातील आपल्या राहत्या घरी गोळ्या झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राला धक्का बसला. पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करून तपास हाती घेतला असता, हा प्रकार उघडकीस आला. सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे पुढील तपास करीत आहेत.