नागपूर : समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात आणि अपघात होणाऱ्या मृत्यूंबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चिंता व्यक्त करीत बुधवारी राज्य सरकार आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) नोटीस बजावली असून ‘समृद्धी’वरील असुविधांबाबत चार आठवडय़ात उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
महामार्गावर अपुरी सुरक्षा व्यवस्था आणि असुविधा होत असल्याने अनिल वडपल्लीवार यांनी महामार्ग तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याची मागणी करणारी जनहित याचिका केली आहे. यावर बुधवारी सुनावणी झाली. समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातात निष्पाप लोकांचा मृत्यू आणि सुविधांच्या अभावामुळे होणाऱ्या अपघातांबद्दल न्यायालयाने तीव्र चिंता व्यक्त केली.
समृद्धी महामार्गाच्या बाजूला हिरवळ नसल्याने रस्ता संमोहन आणि आयआरसी मार्गदर्शक तत्त्वांनुसार अनिवार्य असलेल्या इतर सुरक्षा निकषांची पूर्तता न केल्यामुळे अपघात होतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. सोबतच समृद्धी महामार्गावर मधून प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांची मद्य प्राशन केल्याबाबतची तपासणी, वाहनाची तपासणी, चाकांचा दर्जा, हवा आणि अन्य बाबी तपासल्या जात नाहीत. त्यामुळे अपघाताच्या संख्येत वाढ झाल्याचे वडपल्लीवार यांचे म्हणणे आहे.