अमरावती : राज्यात टोमॅटोचे भाव अचानक वाढल्याने  वस्‍तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्‍याचा निर्णय कृषी आयुक्‍तालयाने घेतला असून  हा अहवाल प्राप्त होताच टोमॅटो लागवड, उत्पन्न व भावाबाबतची वस्तुस्थिती लवकरच स्पष्ट होणार आहे. राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण ५६ ते ५७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे ४० ते ४२ हजार हेक्टर तर रब्बी व उन्हाळी हंगामात सर्वसाधारण १६ ते १७ हजार हेक्टर क्षेत्र असते. यापासून सर्वसाधारणपणे १० लाख मे. टन उत्पादन अपेक्षित असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जुलैमध्ये बाजारात टोमॅटो चे वाढलेले दर लक्षात घेता कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक, जिल्ह्यांचे अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या समवेत या प्रश्नांचे अनुषंगाने नुकतीच बैठक घेण्यात आली. या बैठकीत टोमॅटो पिकाखालील खरीप हंगामातील क्षेत्र आणि उत्पादन याबाबत माहिती तात्काळ सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यात गेल्या डिसेंबर २०२२ ते मे २०२३ दरम्यान टोमॅटोला बाजारात अतिशय अल्प दर मिळाल्याने (६ ते ११ रुपये प्रति किलो) शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागले. त्यामुळे नवीन टोमॅटो लागवडीवर त्याचा विपरित परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

हेही वाचा >>> देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याचे काय झाले? माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा सवाल

या व्यतिरिक्त मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी पाऊस, गारपीट यामुळे देखील टोमॅटो आणि इतर भाजीपाला याचे नुकसान झाल्याने त्याचा उत्पादनावर विपर‍ित परिणाम झाला असल्याचे दिसून येते. चालू वर्षी पाऊस देखील जून महिन्यात जवळपास १५ दिवस उशिरा आला आणि तो सरासरीच्या जेमतेम ५४ टक्के एवढा झाला. यामुळे नवीन लागवडीस उशीर झाला असल्याचे आढळून येते. सध्या शेतकरी नवीन टोमॅटोची लागवड करत आहेत. याबाबत येत्या ७ ते ८ दिवसांत वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल. टोमॅटो लागवडीबाबत नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रमुख क्षेत्र असून त्या जिल्ह्याच्या अधीक्षक कृषी अधिकारी यांचे कडून प्रामुख्याने नवीन लागवडी बाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Report on tomato cultivation rates the facts will become clear soon mma 73 ysh
Show comments