वर्धा : राजकीयदृष्ट्या आता विविध समाज सजग होवू लागले आहे. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत त्याचे जाहीर चित्र उमटत असते. विदर्भातील काही जिल्ह्यात राजकीय दबदबा राखून असलेल्या तेली समाजानेही आवाज बुलंद करीत राजकीय हिस्सेदारीसाठी दावा करने सुरू केल्याचे दिसून आले आहे. प्रांतिक तैलिक महासंघाने तर दहा टक्के वाटा विदर्भात मिळावा म्हणून मागणी केलेली होती. त्यामुळे कोणत्या पक्षाने कुठून तेली समाजाचा उमेदवार दिला हे पाहणे रंजक ठरेल.

वर्धा जिल्हा हा तेली समाजाचा गड समजल्या जातो. दिवं. ज्येष्ठ नेते प्रमोदबाबू शेंडे हे समाजाचे प्रखर नेते होऊन गेले. या समाजाचे अन्य आमदार पण जिल्ह्यात होऊन गेले. आता तर समाज संघटनेचा दबाव पाहून वर्धा जिल्ह्यात विशेष हिस्सेदारी मिळाली आहे. काँग्रेसने वर्ध्यातून शेखर प्रमोद शेंडे, भाजपने देवळीतून राजेश बकाने व राष्ट्रवादी शरद पवार गटाने हिंगणघाटमधून अतुल वांदिले यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीत भाजपने कामठीतून चंद्रशेखर बावनकुळे, पूर्व नागपूर कृष्णा खोपडे, देवळी राजेश बकाने तर अजित पवार गटाने तुमसर येथून राजू कारेमोरे या तेली नेत्यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीने ब्रम्हपुरीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, वर्ध्यातून शेखर शेंडे, यवतमाळमधून बाळासाहेब मंगरूळकर, हिंघणघाट राष्ट्रवादी शरद पवारचे अतुल वांदिले, तुमसर येथून राष्ट्रवादी शरद पवार चरण वाघमारे, बिडमधून संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आहे. परिवर्तन महाशक्तीतर्फे रामटेकमध्ये संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कारेमोरे हे लढत आहे.

हेही वाचा – नागपूर : अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी ‘स्निफर डॉग’ तैनात

एक गंमतदार लढत तुमसर येथून दिसून येते. पवार काका पुतण्याने या मतदारसंघात तेलीच उमेदवार दिला. अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजू कारेमोरे विरुद्ध शरद पवार गटाचे चरण वाघमारे अशी तेली समाजाच्याच दोन नेत्यांत मुख्य लढत होत आहे. त्यामुळे तेली विरुद्ध तेली असा सामना होत भलताच निकाल लागतो की काय, अशी शंका निर्माण होण्यास वाव असल्याचे संघटनेने विदर्भ प्रभारी बळवंत मोरघडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – लोकजागर : साटेलोट्यांचे ‘शिलेदार’!

विधानसभा निवडणुकीत तेली समाजासास उमेदवारी दिल्याबद्दल तैलिक प्रांतिक महासंघाचे अध्यक्ष असलेले माजी खासदार रामदास यांनी त्या त्या पक्षनेत्यांचे आभार मानले आहे. ज्या समजबांधवांना उमेदवारी मिळाली त्यांचे अभिनंदन करीत त्यांना संघटना महासचिव डॉ. भूषण कर्डीले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. युवा आघाडीचे विपीन पिसे तसेच संघटनेच्या विविध आघाड्यांचे पदाधिकारी यांनीही विजयासाठी शुभेच्छा दिल्यात.