देवेश गोंडाणे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठावर सध्या अधिराज्य गाजवणाऱ्या सत्ताबाह्य केंद्रातील ‘सुपर कुलगुरू’ महिलेकडून मानवतेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंतांच्या विचारांना तडा दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. बी.कॉम. द्वितीय वर्षांच्या ‘पारिजात’ पुस्तकात डाव्या विचाराच्या साहित्यिकाच्या कवितेचा समावेश केल्याचा आरोप करीत ‘सुपर कुलगुरू’ महिलेने पुस्तक प्रकाशनाला विरोध केल्याचा आरोप पुस्तकाच्या संपादक डॉ. सोनू जेसवानी यांनी केला.
या विरोधाला न जुमानता पुस्तक लागू केल्याने डॉ. जेसवानी यांना विद्यापीठातील सर्व समित्यांवरून हटविण्यात आले आहे. शैक्षणिक वर्तुळात या घटनेचा तीव्र विरोध होत आहे. नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुभाष चौधरी यांची नियुक्ती झाल्यापासून सत्ताबाह्य केंद्रातील एका शिक्षक संघटनेच्या महिला अध्यक्षांनी प्रशासनावर आपली पकड जमवली आहे. विद्यापीठातील कुठल्याही प्राधिकरणांवर किंवा पदावर नसतानाही प्रशासनातील प्रत्येक निर्णयामध्ये त्यांची ‘सुपर कुलगुरू’ म्हणून प्रमुख भूमिका असते. परिणामी कुणाच्या नियुक्त्या करण्यापासून ते अभ्यासक्रमामध्ये कुठल्या विचारधारेच्या व्यक्तीचे लेख, कविता असाव्या, हे निर्णय ‘सुपर कुलगुरूं’च्या आदेशावर होतात. हिंदी विषयात पीएच.डी. करणाऱ्या दोन विद्यार्थिनींच्या छळ प्ररकणाने हा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे. व्हीएमव्ही महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉ. सोनू जेसवानी यांनी संपादित केलेल्या ‘पारिजात’ या बी.कॉम. द्वितीय वर्षांतील पुस्तकामध्ये हिंदी साहित्यिक सागर खादीवाला यांची देशभक्तीपर कविता देण्यात आल्याने ‘सुपर कुलगुरू’ महिला भडकल्या.
खादीवाला आपल्या विचारधारेचे (संघ विचाराचे) नसल्याने त्यांची कविता पुस्तकातून वगळण्याचा आदेश त्यांनी दिला. मात्र, संपादक मंडळाच्या पत्रव्यवहारामुळे त्यांची कविता वगळणे शक्य झाले नाही. यामुळे खादीवालांच्या कवितेसह हे पुस्तक प्रकाशित झाले. परंतु, याचे दूरगामी परिणाम डॉ. जेसवानी यांना भोगावे लागले. खादीवाला आपल्या विचाराचे नसतानाही त्यांची कविता पुस्तकात समाविष्ट केल्याच्या आरोपावरून डॉ. जेसवानी यांना अभ्यास मंडळासह विद्यापीठातील अन्य समित्यांमधून काढण्यात आले आहे. कारकीर्द संपविण्याची धमकी
वाणिज्य अभ्यासक्रमाच्या भाषा विषयासाठी असलेल्या अभ्यास मंडळामध्ये हिंदी, इंग्रजी आणि मराठी अशा तिन्ही भाषांच्या प्राध्यापकांचा समावेश असतो. या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. ईश्वर सोमनाथे हे मराठी विषयाचे आहेत. तर डॉ. सोनू जेसवानी या एकमेव हिंदी विषयाच्या प्राध्यापिका मंडळात होत्या. बी. कॉम. द्वितीय (वाणिज्य पदवी) वर्षांसाठी नवीन हिंदी विषयाचा अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी डॉ. जेसवानींवर होती. त्यांनी ‘पारिजात’ नावाच्या पुस्तकामध्ये अभ्यासपूर्ण कविता आणि लेख दिले. यात सागर खादीवाला यांची देशभक्तीपर कविताही आहे.
मात्र, पुस्तक प्रकाशनासाठी जाताच प्रकाशकाने फोन करून खादीवाला यांची कविता का घेतली, असा सवाल केला. ही कविता वगळा अन्यथा शिक्षण क्षेत्रातील तुमची कारकीर्द संपेल, अशी धमकीही त्यांनी दिल्याचा आरोप डॉ. जेसवानी यांनी केला. त्यानंतर डॉ. जेसवानी यांनी विद्यापीठातील सत्तेच्या केंद्रिबदू असलेल्या ‘सुपर कुलगुरू’ महिलेशी संपर्क साधला असता त्यांनी ते दुसऱ्या विचारांचे असताना कविता घेतलीच कशी, ती वगळावी लागेल, असे सांगितले. मात्र, डॉ. जेसवानी यांनी त्यास नकार दिला. शेवटी ‘पारिजात’चा परिणाम म्हणून डॉ. जेसवानी यांचे अभ्यासमंडळातील पद काढून घेण्यात आले.

‘आरआरसी’मध्ये नियमबाह्य नियुक्ती
‘सुपर कुलगुरू’ इतक्यावरच थांबल्या नाहीत तर डॉ. जेसवानी यांना हिंदीच्या आरआरसी-संशोधन सल्लागार समितीतूनही बाहेर करण्यात आले. विशेष म्हणजे, डॉ. जेसवानी या २०१२ पासून पीएच.डी. मार्गदर्शक असून त्यांच्या तीन विद्यार्थ्यांना पीएच.डी. मिळाली आहे. असे असतानाही त्यांना काढून त्यांच्या जागेवर नुकत्याच पीएच.डी. झालेल्या, मार्गदर्शक नसलेल्या डॉ. आभा सिंग यांची नियमबाह्य नियुक्ती करण्यात आल्याचा आरोपही डॉ. जेसवानी यांनी केला आहे. याशिवाय त्यांना हिंदी विषयाच्या नियामक आणि मूल्यांकन प्रक्रियेतूनही दूर करण्यात आले.

Story img Loader