लोकसत्ता टीम
नागपूर : लोकसभा निवडणूकीचे रणशिंग फुकले गेले आहे. मात्र राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. महाराष्ट्रातील ४८ पैकी कोणता पक्ष किती जागेवर लढणार आहे याबाबत अद्यापही संभ्रम आहे. यामध्ये आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) उडी घेतली. महायुतीने राज्यात रिपाइंला लोकसभेच्या दोन जागा द्याव्या, अशी मागणी पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नागपूर येथे केली आहे.
आरपीआयला शिर्डी आणि सोलापूर लोकसभेची जागा दिली जावी, अशी आमची मागणी आहे. शिर्डी येथून स्वत: निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी याबाबत सकारात्मक चर्चा देखील झाली. नागपूरमध्ये केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याशी भेट करून याबाबत त्यांना विनंती करणार आहे ‘एनडीए आम्हाला राज्यात दोन जागा देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मात्र काही कारणास्तव त्यांनी जागा दिली नाही तरीही आम्ही एनडीएसोबतच राहणार, असे आठवले यांनी स्पष्ट केले. एनडीएशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. सहजासहजी आरपीआय मोदी यांचा साथ सोडणार नाही. मोदीही आम्हाला इतक्या सहजी सहजी जाऊ देणार नाही. त्यामुळे दोन नाही तर किमान एकतरी जागा आमच्या सोडण्यात यावी’, असे रामदास आठवले म्हणाले.
आणखी वाचा- ‘बुद्धिस्ट इंटरनॅशनल’च्या मोर्च्यात एकवटला आंबेडकरी समाज; महिला, भिक्कुसंघाचा लक्षणीय सहभाग
शिंदे गटाने जागा सोडावी
शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे सध्या शिर्डी मतदारसंघाचे खासदार आहेत. या मतदारसंघात अनेक मात्तबर नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ आहेत. राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे आणि मधुकर पिचड या नेत्यांचे विधानसभा मतदारसंघ शिर्डी या मतदारसंघात आहे. मागच्या वेळी लोखंडे यांनी लोकसभेच्या निवडणूकीत माझा पराभव केला होता. लोखंडे हे शिंदे गटाचे आहेत आणि शिंदे गट एनडीएचा भाग आहे. त्यामुळे शिंदे गटाने ही जागा रिपाइंसाठी सोडावी , असे आठवले म्हणाले.
विस्तारात मंत्रीपद मिळायला हवे होते
राज्यात मंत्रीमंडळ विस्तारात आरपीआयला किमान एकतरी मंत्रीपद मिळायला हवे होते. देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा झाली होती. मात्र मित्रपक्षांची संख्या जास्त झाल्याने आरपीआयला मपद मिळाले नाही. निवडणूकीनंतर आरपीआयला पद मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. महामंडळांमध्येही आरपीआयला प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रयत्नरत असल्याचे आठवले यांनी सांगितले.