नागपूर : शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्यांतर्गत एका मुलीने मुलावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यावरून गुन्हा दाखल झाला. डेटिंग ॲपवरून नागपूरमधील मुलीची पुण्यात राहणाऱ्या आरोपी मुलासोबत ओळख झाली होती. यानंतर दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. मात्र मुलीने काही महिन्यानंतर मुलावर बलात्काराचा आरोप केला. आता मुलीने ही तक्रार गैरसमजातून झाली असल्याचे उच्च न्यायालयाला सांगितले. मला चांगले भविष्य घडवायचे आहे आणि भूतकाळ विसरायचा आहे, अशा आशयाचे शपथपत्र मुलीने न्यायालयात सादर केले आणि मुलावरील बलात्काराचा गुन्हा रद्द करण्याची न्यायालयाला विनंती केली.
दोन वर्ष शारीरिक संबंध
ऑगस्ट २०२१ मध्ये तक्रारदार मुलीची पुण्यात राहणाऱ्या मुलासोबत टिंडर डेटिंग ॲपवरून ओळख झाली. यानंतर त्यांच्यात व्हॉट्सॲप संवाद सुरू झाला आणि मैत्री झाली. काही दिवसानंतर या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. संधी मिळाल्यावर दोघेही सातत्याने एकमेकांना भेटायला लागले. २८ जून २०२२ रोजी मुलगा पहिल्यांदा मुलीच्या राहत्या घरी गेला आणि त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. २०२४ मधील मार्चपर्यंत सुमारे दोन वर्ष त्यांच्यात सातत्याने संबंध प्रस्थापित होत राहिले. एप्रिल २०२४ मध्ये मुलाचा एका दुसऱ्या मुलीसोबत विवाह ठरल्याचे मुलीला समजले. यानंतर मुलीने २६ ऑगस्ट रोजी बलात्काराची तक्रार दिली. सीताबर्डी पोलिसांनी आरोपी मुलावर भादंवि कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी मुलाने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. न्या.अविनाश घरोटे आणि न्या.अभय मंत्री यांच्या खंडपीठासमक्ष याप्रकरणी सुनावणी झाली. यावेळी मुलीने चुकीने बलात्काराची तक्रार केली असल्याची कबुली दिली.
हेही वाचा >>>सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
मुलाचे आयुष्य उद्धवस्त
याप्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली. दोघांमध्ये सहमतीने दोन वर्ष शारीरिक संबंध प्रस्थापित होत राहिले. मुलाने संबंध प्रस्थापित करण्याकरिता बळाचा वापर केला नाही. कायद्याची निर्मिती हे लोकांचे आयुष्य उद्धवस्त करण्यासाठी नव्हे तर न्याय देण्यासाठी झाली आहे, असे न्यायालय म्हणाले. बलात्काराचा गुन्हा हा गैरसमजातून दाखल झाला असल्याची कबुली स्वत: मुलीने शपथपत्रातून दिल्याने न्याय देण्यासाठी गुन्हा रद्द करण्याचा शक्तीचा न्यायालय वापर करत आहे, असेही न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. आरोपी मुलाच्यावतीने ॲड.एम.आय.हक यांनी तर तक्रारदार मुलीच्यावतीने ॲड.ए.ख्वाजा यांनी बाजू मांडली. पोलिसांच्यावतीने ॲड.ए.एम.घोगरे यांनी युक्तिवाद केला.