बुलढाणा : नांदुरा तालुक्यातील दहीवडी गावात राबविण्यात आलेल्या थरारक बचाव मोहिमेत तब्बल ६२ सापांच्या पिल्लांना जीवदान देण्यात आले. हे जिल्ह्यातील विक्रमी ‘रेस्क्यू ऑपरेशन’ ठरले!दहिवडी शिवारातील शेतात सापांची पिल्ले असल्याची माहिती भयभीत गावकऱ्यांनी दिली. यानंतर वनविभागाचे अधिकारी राजेश शिरसाट व ओमसाई फाऊंडेशनची चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी शेतात शोध मोहीम राबवून पिल्लांना ताब्यात घेतले. फाऊंडेशनचे विलास निंबोळकर यांचे सह सर्पमित्र सचिन पुंडे व अन्य सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
त्या पिल्लांना शंभू नालट, जय गवई व इतर स्वयंसेवक यांनी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले. ही पिल्ले पान दिवड या बिनविषारी जातीच्या सापाची असल्याचे निंबोलकर यांनी सांगितले.बिनविषारी असला तरी या जातीचे साप रागीट राहतो. दंश करण्याची खुमखुमी असलेला हा साप माणसाने हाताळला असता उग्र वास सोडतो. गाव, शहर, जंगल, डबके किंवा पाणथळ जागा, खडकाळ प्रदेश, दगड किंवा विटांचे ढिगारे या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या या सापाचे खाध्य बेडूक किंवा टोड, मासे हे आहे.
हेही वाचा >>>नागपूरमध्येही डी.जे. लेझर लाईट्सला विरोध, डावे पक्ष रस्त्यावर
हा साप लहान असताना माश्यांची पिल्ले किंबा बेडकाची पाण्यातली लहान पिल्ले खाउन वाढतो. याचा स्वभाव प्रचंड तापट असतो आणि तो दंश करण्यात पटाईत आहे. याचा दंशसुद्धा जोरदार आणि वेदनादायक असतो. पण हा साप पुर्णपणे बिनविषारी असल्यामुळे याच्या चाव्याचा आपल्यावर काहीही परिणाम होत नाही. हा साप चिडला की डोके वर काढतो आणि मानेकडचा भाग रुंदावतो, याने फणा काढला हा नाग आहे असा गैरसमज होतो.