बुलढाणा : कंत्राटदाराने एक वर्षाच्या करारावर मध्यप्रदेशातून मेंढी चराईसाठी आणलेल्या ५ बालमजुरांची बुलढाणा येथील चाईल्ड लाईनने मेंढपाळांच्या तावडीतून सुटका केली. या मुलांची येथील बालगृहात रवानगी करण्यात आली आहे. बुलढाणा येथील चाईल्ड लाईनला मुंबई येथील चाईल्ड लाईनकडून ही माहिती मिळाली होती. त्यानुसार चिखली मार्गावरील वृंदावन नगर परिसरासह भगीरथ खत कारखान्याच्या परिसरात शोध घेण्यात आला.
यावेळी ५ ते ६ वर्षाची मुले ठेकेदाराकडून मेंढी चराईसाठी बालमजूर म्हणून राबविण्यात येत असल्याचे आढळून आले. समन्वयक शेख व सहकाऱ्यांनी चाईल्ड लाईनच्या संचालक जिजा चांदेकर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती घेतली. यानंतर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी आणि बुलढाणा शहर पोलिसांसमवेत घटनास्थळवरून पाच बालमजुरांची सुटका केली.
हेही वाचा : नागपूर : आयसीआयसीआय बँकेची ४० लाखांची फसवणूक
समितीनेही या बालकांचे समुपदेशन करून त्यांचे जबाब नोंदविले. कंत्राटदारांना बुलढाणा पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या विरोधात बाल अधिनियम कायदा २०१५ नुसार गुन्हे दाखल केले आहे. बाल कल्याण समिती आता मध्यप्रदेशात जाऊन या मुलांच्या कुटुंबीयांचे जबाब घेणार आहे. त्यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात मध्यप्रदेशातच गुन्हा दाखल होईल, असे शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर यांनी सांगितले.