नागपूर : हरितगृह वायू उत्सर्जनासाठी उद्योग आणि संबंधित बाबीच जबाबदार नाहीत, तर परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या अन्नामुळेदेखील हे उत्सर्जन वाढत असल्याचा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे. भाजीपाला आणि फळांची वाहतूक करताना विशिष्ट तापमान आवश्यक असते. ही तापमान नियंत्रित अन्न वाहतूक करताना हरितगृह वायू उत्सर्जनात भर पडत आहे. त्यामुळे हवामान संकट टाळायचे असेल तर परदेशातून आयात केलेले अन्न न खाता, देशात पिकवलेले अन्न खायला हवे, असा सल्लादेखील या संशोधनाद्वारे देण्यात आला आहे.
सिडनी विद्यापीठाच्या अरुणिमा मलिक आणि मेंग्यू ली यांचे हे संशोधन आहे. अन्न पिकवणाऱ्या देशातून इतर देशांदरम्यान अन्नाची वाहतूक केल्यामुळे सुमारे एक पंचमांश हरितगृह वायू उत्सर्जन होते आणि दुर्दैवाने यात समृद्ध देशाचे योगदान मोठे आहे. जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे १६ दशलक्ष टन हरितगृह वायू उत्सर्जन केवळ तापमान नियंत्रित अन्न वाहतुकीमुळे होते. हे प्रमाण एकूण मानवनिर्मित कार्बन उत्सर्जनाच्या ३० टक्के आहे. या वाहतुकीशिवाय जमीन वापरातील बदल आणि उत्पादन प्रक्रियेमुळेदेखील उत्सर्जन होते.
पाणी, रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीद्वारे अन्नाचा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास होताना उत्सर्जन होते. जागतिक स्तरावर फळ आणि भाज्यांच्या वाहतुकीमुळे सुमारे ३६ टक्के अन्न वाहतूक उत्सर्जन होते. उत्पादनादरम्यान जेवढे उत्सर्जन होते, त्याच्या दुप्पट हे उत्सर्जन आहे. कारण भाजीपाला आणि फळांच्या वाहतुकीदरम्यान विशिष्ट तापमानाची गरज असते.
अन्नाच्या जागतिक व्यापारात अनेक मोठय़ा आणि उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे वर्चस्व आहे. चीन, जपान आणि पूर्व युरोपमध्ये अन्नाची मागणी ही देशांतर्गत उत्पादित केलेल्या उत्पादनापेक्षा अधिक आहे. त्यामुळे अन्न वाहतुकीदरम्यान या देशांमुळे सर्वाधिक उत्सर्जन होते.
स्थानिक अन्न महत्त्वाचे..
अन्नाचा सर्वात मोठा निर्यातदार म्हणून ब्राझीलचे नाव घेतले जाते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, भारत आणि अर्जेटिना या देशांचा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियात फळे आणि भाज्यांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे हे देश इतर देशाला निर्यात करतात. संशोधकांनी वनस्पती आधारित खाद्यपदार्थाच्या तुलनेत मांस आणि इतर प्राण्यांशी संबंधित उत्सर्जनावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. श्रीमंत देशांमध्ये अन्न वाहतूक उत्सर्जन कमी करण्यास मोठा वाव आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर पिकवलेले आणि उत्पादित केलेले अन्न खाणे महत्त्वाचे आहे, असेही या संशोधनात म्हटले आहे.